कारंजा शहरात लटारे महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य पालखी सोहळा व महाप्रसाद

बाळकडू वृत्तसेवा| वर्धा जिल्हा
कारंजा (घाडगे):
दि.२६/०५/२०१९
    कारंजा शहराचे ग्रामदैवत श्री संत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त  महाराजांची शहरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली व दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.
     कारंजा शहराचे ग्रामदैवत श्री संत लटारे महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त येथील मंदिरात दि.१९ ते २६ मे दरम्यान सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस स.९ ते ११ व सायं. ३ ते ६ सुश्री रामप्रियाजी(माईजी) यांच्या सुमधुर वाणीतून भागवत पारायण नित्यनियमाने चाललं होतं. दररोज रात्री किर्तन, भजन, भारूड असे समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले गेले होते.
    यासोबतच दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि. २५ ला महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. शहरातील व बाहेर गावाहून आलेले मिळून तब्बल ३६ भजन मंडळ व विविध पथक या मिरवणूकीत सहभागी झाले होते. नागपूर येथून बंडूजी खंडारे यांचं मास्टर बॅंड पथक स्वयंस्फुर्तीने पालखीत सहभागी झालं होतं. लेझीम पथक, नृत्य पथक तसेच विविध धार्मिक वेशभूषा केलेल्या व्यक्ती या पालखी सोहळ्यात  सहभागी झाल्या होत्या. विद्यमान आमदार अमरभाऊ काळे व माजी आमदार दादारावजी केचे हे सुद्धा पालखीच्या बरोबर चालत होते. भाविकांच्या सुविधेसाठी मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी थंड पाणी, ताक, सरबत व अल्पोपहाराचे स्टॉल नागरिकांनी व शहरातील कॉंन्वेंट्सनी लावले होते. एकतेचा संदेश देत शहरातील मुस्लिम बंधूंनी सुद्धा पालखीतील भाविकांना सरबत वाटप केले.
      मेहेर बाबा केंद्र व संवेदना युवा मंच चे स्वच्छता पथक मिरवणूकीच्या मार्गावर होणारा कचरा गोळा करत तो कचरा नगरपंचायत ने उपलब्ध करून दिलेल्या ट्रॅक्टर मध्ये जमा करत होते. अशा शिस्तबद्ध पद्धतीने हा पालखी सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी दि.२६ ला तालुक्यातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
-गौरव नासरे,
बाळकडू प्रतिनिधी
८०८७०९१८९९