दादर – माहीम शिवसेनेचाच अभेद्य गड 

“बाळकडू” वृत्तपत्र | मुंबई महानगर
रविवार दि.२६ मे, २०१९
मुंबई, दि.२५ : दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून ९१ हजारांहून अधिक मतांचा कौल मिळाला आहे. त्यामुळे दादर-माहीम परिसर शिवसेनेचाच अभेद्य गड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
      दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना ४ लाख २४ हजार ९१३ तर महाआघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना २ लाख ७२ हजार ७७४ मते मिळाली आहे. राहुल शेवाळे तब्बल १ लाख ५२ हजार १३९ मतांनी विजयी झाले.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे मताधिक्य वाढले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे हे १ लाख ३८ हजार १८० च्या मताधिक्याने विजयी झाले होते. या निवडणुकीत १३ हजारांहून अधिक मताधिक्य वाढले आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढत असल्याने स्पष्ट झाले आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमधील समन्वयामुळे यंदा प्रचारात आघाडी घेतल्याने मताधिक्यही वाढले आहे.
     धारावीतील मक्तेदारी संपुष्टात
         या लोकसभा मतदारसंघात अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा व माहीम असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा मतदारसंघात धारावीतही एकनाथ गायकवाड यांना फारशी आघाडी राखता आली नाही. त्यामुळे धारावीतील गायकवाड कुटुंबीयांची मक्तेदारी संपुष्टात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड या धारावीतून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत पण तरीही त्यांना धारावीत फार आघाडी मिळालेली दिसत नाही.
   बहुजन वंचित आघाडीचा काँग्रेसला फटका
     या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे संजय भोसले यांच्या उमेदवारीचा मोठा फटका काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना बसला आहे. वंचित बहुजन आघाडीला या मतदारसंघात ६३ हजार ४१२ मते मिळाली. दलित, मुस्लिम समाजाची परंपरागत मते काँग्रेसला मिळतात, पण ही मते वंचित बहुजन आघाडीकडे वळल्यामुळे काँग्रेसला काही प्रमाणात फटका बसला. पण तरीही राहुल शेवाळे यांची दीड लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य काँग्रेसला तोडता आले नाही. या मतदारसंघात बसपाचे अहमद शकिल सगीर अहमद शेख हे निवडणूक रिंगणात होते, पण त्यांना फक्त ८ हजार ६३५ मते मिळाली.
   दादर-माहीम शिवसेनेचेच
      या सहा विधानसभा मतदारसंघापैकी शेवाळे यांना सर्वाधिक मते माहीम विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहे. माहीममध्ये शेवाळे यांना ९१ हजार ६३५ मते मिळाली आहेत. त्यामुळे दादर-माहीम हा शिवसेनेचा अभेद्य गड असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेची विधानसभा निहाय मते
अणुशक्तीनगर – ६२ हजार २५३
चेंबूर              – ७५ हजार ६३९
धारावी           – ४८ हजार ९३२
सायन-कोळीवाडा – ७० हजार ४१५
वडाळा            – ७३ हजार ४१५
माहीम             – ९१ हजार ६३५
“बाळकडू” पत्रकार – पंडित मोहिते-पाटील
(मुंबई महानगर प्रतिनिधी)