यंदा चारा व पाण्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्‍यात

बाळकडू वृत्तसेवा नाशिक जिल्हा
लासलगाव(ता निफाड)दि २५ मे २०१९
लासलगाव परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतात परंतु यंदा चारा व पाण्याअभावी दुग्ध व्यवसायही धोक्‍यात आला आहे. एप्रिल महिन्यापासूनच शेतकरी आपल्या पशुधनाला महागडा चारा, मका, ऊस, बांडी विकत घेवून खाऊ घालत आहे. चाऱ्याच्या अभावामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम होत असल्याची माहिती दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
शेतीतील विहिरी,बोरवेल महिन्यापासून शेवटच्या घटका मोजत असून अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याअभावी जनावरांना हिरवा चारा करणे सुध्दा शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे. यंदा खरीप व रब्बी हंगामातील पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने दुधाला तरी भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी धरून होता. त्यामुळे शेतकरी आपल्या दुभत्या गायी-म्हशींना विकत का होईना मिळेल त्या किंमतीत हिरवा चारा, मका, ऊस, उसाच्या बांड्या दुरवरून आणत आहेत.
सध्या उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्याने वातावरणातील बदलामुळे जनावरे आजारी होवू लागले आहेत. दुभते जनावरे सांभाळणे देखील दुरापास्त झाले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुधाला समाधानकारक भाव मिळत नसून दुध वाढीसाठी केलेला खर्च फिटने देखील अवघड झाले असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.दरवर्षी या परिसरात पावसाळ्यात पाऊस पडला की परिसर हिरवाईने नटून जायचा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरे चरण्यासाठी येत होती. मात्र दिवसेंदिवस पाऊस कमी होत असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून चाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. या भागात चारा नाही, छावण्या नाहीत त्यामुळे शेतकरी वर्गावर जनावरांना बाजाराची वाट दाखवण्याची वेळ आली आहे.
प्रतिक्रिया
सध्या उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्याने वातावरणातील बदलामुळे जनावरे आजारी होवू लागले आहेत.दुभते जनावरे सांभाळणे देखील दुरापास्त झाले आहे.पाण्याअभावी जनावरांना हिरवा चारा करणे सुध्दा शेतकऱ्यांना अवघड झाले
असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सुभाष गरड( दूध उत्पादक शेतकरी)
समीर पठाण(बाळकडू पत्रकार)
लासलगाव शहर प्रतिनिधी
९८२२१७१०८५