लोककल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज (लेख) – प्राचार्य एन.एन.जाधव

लोककल्याणकारी राजा


आजची कोरोना परिस्थिती किती गंभीर? किती भयंकर? याची प्रचिती आजच्या पिढीने अनुभवली आहे. असेच 1896,1897 या काळात महामारीमुळे विपरीत घडत होते. उद्या आपण असो की नसो! केव्हा काय होईल? हे कोणालाही समजत नव्हते. आजच्यापेक्षा ती परिस्थिती महाभयंकर होती, कारण आज आरोग्याच्या सुविधा मुबलक आहेत. तेव्हा अशा सुविधांची वानवा होती. त्यातच लोक निरक्षर, दारिद्र्य, अज्ञान अशा परिस्थितीत जगत होते म्हणून ती परिस्थिती महाभयंकर होती.
तेव्हा एका तरुण नेतृत्वाने ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व लोकांना बोलावले. तिथे खुर्ची टेबल व एक वैद्यकीय साहित्य असलेला बॉक्स मांडण्यात आला. परिचारक व डॉक्टर उपस्थित होते. परिचारक यांनी बॉक्समधून इंजेक्शन बाहेर घेतले. सुईने त्यात औषध भरले. सर्वांना ते इंजेक्शन दाखवण्यात आले व तरुण उमद्या नेतृत्वाने सर्वसाक्षीने डॉक्टर मार्फत आपल्या दंडात ते इंजेक्शन घेतले. जमलेले सगळे लोक अवाक झाले. आता काय होणार? काही घाबरले, काही निघून गेले परंतु त्या तरुण नेतृत्वाने दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्वांची भेट घेतली आणि सर्वांना विचारले. पहा,मी जिवंत आहे ना? मी दुप्पट वेगाने काम करत आहे. तुम्ही सुद्धा इंजेक्शन घ्या आणि आपली महामारीपासून सुटका करून घ्या. हा धाडसाने प्रयोग करून दुसऱ्याला संदेश देणारा तो तरुण म्हणजेच राज्यकर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महामारी म्हणजे प्लेग व ते इंजेक्शन म्हणजे लस
छत्रपती शाहू महाराज सर्वार्थाने एक वेगळे, अलौकिक असे व्यक्तिमत्व होते. कागल घराण्यातील घाटगे कुटुंबातील हे यशवंतराव पुढे नव्या कोल्हापूरचे निर्माते,आपल्या कर्तुत्वाने छत्रपती शाहू महाराज झाले.
प्रशासन लोकाभिमुख व्हावे म्हणून शाहू महाराज सतत प्रयत्नशील राहिले. लोकांमधील गुणग्राहकता त्यांच्याकडे अचूक होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व त्यांनी सर्वप्रथम ओळखले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांच्याशीही त्यांचा शिक्षणस्नेह नेहमीच वाढत गेला. लष्करामधील जनरल थोरात यांची गुणवत्ता लहानपणीची ओळखून त्यांच्या कार्याला योग्य दिशा देण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांकडून केले गेले.
बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने जाग यावी. प्रयत्नशील माणसे, कर्तबगार माणसे निर्माण व्हावेत. निरक्षरता, जुन्या कर्मठ चालीरीती, अंधश्रद्धा, मान्यता पावलेली व्यसनाधीनता या सगळ्यांसाठी कार्य करणाऱ्या समाजसुधार यादीत अग्रभागी असे संत गाडगेबाबा होते. तसेच एक अद्भुतरम्य लोकप्रशासन पंचगंगेच्या परिसरात दिसत होते.
एक अदृश्य युद्ध सुरू होते. हे युद्ध,परकिया विरुद्ध नसून स्वकीय विरुद्ध होते. धनदौलत गोळा करणे, राज्य विस्तार करणे यासाठी नसून गोरगरीब, दलित यांच्या उद्धारासाठी होते. सामाजिक अन्यायाचे खंडण आणि जुन्या घातक परंपरांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी होते. हे युद्ध तलवारीचे नव्हते, तत्वाचे होते आणि योद्धे होते छत्रपती शाहू महाराज.
देशात राखीव जागांचे धोरण सर्व प्रथम छत्रपती शाहू महाराजांनी राबवले. पन्नास टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखून ठेवून सर्वांनाच समान प्रशासनात संधी देण्याचा प्रयत्न करणारे भारत देशातील ते पहिले राज्यकर्ते होते. भास्करराव जाधव, आ.ब.लठ्ठे. दाजीराव विचारे.अशा बहुजन समाजातील, कर्तबगार, शिस्तप्रिय लोकांना राज्यात अधिकार पदे देवून प्रशासनात नवनिर्मिती केली. छत्रपती शाहू महाराज नेहमीच संकटाचे रूपांतर संधीत करत असत 1897 चा प्लेग, दुष्काळ यामुळे मोठी चिंता निर्माण केली, परंतु चिंतनातून बंधाऱ्याच्या रुपाने त्यांनी मार्ग शोधला. बारमाही पाण्यासाठी राधानगरी सारखे धरण त्यांनी बांधून काढले. या धरणाला धक्का पोहोचू नये म्हणून किंवा भूकंपामुळे नुकसान होऊ नये म्हणून मुख्य भिंतीजवळ सिसे ओतून ते भक्कम केले,तसेच आधुनिक अभियंत्याच्या प्रयोगाने स्वयंचलित दरवाजे या धरणाला दिले. आज 100 वर्षांपेक्षाही जास्त कालावधी गेला तरी दिमाखात हे धरण व स्वयंचलित दरवाजे आपले काम नेकीने करत आहेत.
शेतकरी म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा. शेतकरी अडचणीत येतो,तो नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी याबरोबर सावकाराच्या महागड्या कर्जाने छत्रपती शाहू महाराजांना माहित होते म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी त्या काळात सहकारी संस्था, सहकारी पतपेढ्या निर्माण केल्या. जेणेकरून शेतकऱ्यांना रास्त दरात कर्ज मिळावे. तसेच वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी शेतमजूर हवालदिल होत असत. त्यासाठी त्यांनी दुष्काळ निवारण विभाग निर्माण केला. तसेच पशुधन हे देश प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचे धन आहे म्हणून त्यांनी सरकारी यंत्रणा, जैन व लिंगायत संघटना यांना पुढाकार घेण्यास सांगून पशुधन जोपासना यावर विशेष लक्ष दिले. दुष्काळा वेळी पशुधन खऱ्या अर्थाने कमी होत जाते. तेव्हा त्यांनी जनावरांसाठी छावणी ही अभिनव संकल्पना देशात प्रथमच वापरली. आज आपल्याला या गोष्टी सामान्य वाटतात परंतु शे-सव्वाशे वर्षापूर्वी या गोष्टी खरोखर अभिनव होत्या.
जसे शेती, शेतकरी, शेतमजूर हे महत्त्वाचे घटक आहेत तसेच मार्केटिंग हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी कोल्हापुरात निर्माण होणारा उत्तम प्रतीचा गूळ स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्याबरोबर मुंबईसारख्या विख्यात बंदरात पाठवून, निर्यात करून,त्यासाठी विशेष प्रयत्न केले. वाहतूक व वितरण यासाठी अनुदान दिले. त्यामुळे कोल्हापूरच्या दर्जेदार गुळाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली कोल्हापूरच्या गुळाचे आज जगात ब्रॅण्डिंग झाले आहे. याची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रयत्नाने झाली. कोल्हापूर मध्ये शाहू मिलची स्थापना करून आधुनिक युगाची पायाभरणी केली. कोल्हापुर हे बलोपसना केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न केले. कोल्हापुरात आजही लाल मातीतील कुस्ती प्रसिद्ध आहे. संपूर्ण देशातील व विदेशातील काही मल्ल याठिकाणी येऊन आपली गुणवत्ता आजमावतात. त्या काळात सर्व आघाड्यांवर महाराजांचे बारीक लक्ष असे. काही वेळेला कुस्ती स्पर्धेमध्ये जर मल्ल टाईमपास म्हणजे कुस्ती निकाली करावयाची नाही असे करू लागले. जसे आजच्या काळातील मॅच फिक्सिंग सारखे करत असेल तर महाराज स्वतः आखाड्यात उतरत व समजावून सांगत, लोकहो, हे प्रेक्षक कुस्ती पाहायला आले आहेत.दर्जेदार खेळ पाहायला आले आहेत. त्यांची निराशा करू नका त्यांनी जर या खेळाकडे पाठ फिरवली तर तुमचे पोटाचे वांदे होतील अशी कमालीची समज त्यांच्याकडे होती.
महात्मा फुले व शाहू महाराज यांच्यात अनेक गोष्टी समान होत्या. सवर्ण व दलित हा भेदभाव कायमचा संपला पाहिजे त्यासाठी सवर्णांनी थोडे पुढे यावे. गोरगरीब व तळागाळातील लोकांसाठी,त्यांचा उद्धार होण्यासाठी प्रभावी काम करावे. शिक्षणाचा प्रसार वरिष्ठांकडून कनिष्ठाकडे न होता शिक्षण हे सार्वत्रिक झाले पाहिजे समाजवादी समाजाची रचना यामधील विषमता काढून शिक्षण, संस्कृती या गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत. काही वेळेला महात्मा फुले यांच्यावर ख्रिश्चन सरकारचे आश्रित म्हणून आरोप होत असे तर शाहू महाराज यांच्यावर स्वराज्यद्रोही छत्रपती असा आरोप केला जात असे. हे दोघेही ब्राह्मण जातीच्या विरोधी नव्हते.परंतु ज्या चालीरीती,प्रथा पद्धती बहुजनांसाठी घातक ठरतात असे करणाऱ्यांच्या ते विरोधी होते. मराठा,जैन, लिंगायत, मुस्लिम, सुतार, नाभिक,दलित अशा सर्वच मुलांसाठी त्यांनी वस्तीगृहे सुरू केली होती.
छत्रपती शाहू महाराज हे अनेक विषयांचे अभ्यासक होते. गणित, संस्कृत पासून ते मैदानी खेळापर्यंत, इंग्लिश सारखी परदेशी भाषा,जगाच्या इतिहासाचे, राज्यकारभाराचे अभ्यासन, अर्थकारणाचे ज्ञान त्यांनी संपादन केले होते. फ्रेझर यांच्यासारख्या विद्वानाचा सहवासात महाराज राहिले यांच्या विद्वत्तेचा व्यक्तिमत्त्वाचा व चारित्र्याचा प्रभाव छत्रपतींवर पडला.त्यांनी फ्रेझर यांना आपले गुरू मानले.
शे दीडशे वर्षांपूर्वीचा काळ खरोखरच विचित्र असा होता.गुण दोषांच्या संस्कारांनी तयार झाला होता. स्पृश्य व अस्पृश्य या संकल्पना विकोपास गेल्या होत्या. अस्पृश्यांना लोक पाणी देत नसत. त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहत नसत.अशावेळी छत्रपती शाहू महाराज सर्वांच्याच सहभोजन पंगतीत सहभागी होत असत. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशाहून परत आल्याचे महाराजांच्या कानी आले,तेव्हा छत्रपती शाहू महाराज मुंबईतच होते.अशा विद्वानाच्या भेटीला हा मोठ्या मनाचा राजा पूर्वसूचनेशिवाय परळ भागातील सिमेंटच्या चाळीत राहणाऱ्या बाबासाहेबांच्या दिशेने धावला. हे ऐकून बाबासाहेब सुद्धा गहिवरले. त्याच वेळी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण दिले. काही दिवसांनी बाबासाहेब कोल्हापूरला गेले. त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.अशा दिव्य दर्शनाने सर्वच लोकांची मने मोहरून गेली.
दूरदृष्टी समोर ठेऊन, फासेपारधी, कोरवी, माकडवाले अशा भटक्या, अस्थिर समाज जीवनाला स्थैर्य निर्माण करून दिले. त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले.जोगिनी, देवदासी यांच्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा करून अशा पीडित मुलींची बाहेर पडण्याची इच्छा असेल त्यांना नवे जीवन बहाल केले.
महाराजांना अनेक मित्र होते तसे काही थोडे शत्रू होते. परंतु या जाणत्या राजाचे, राज्यकर्त्याचे धोरणच सर्वसमावेशक असल्याने तेव्हापासून आज पर्यंत असे दिसते की, विरोधक सुद्धा त्यांच्या कार्याची महती समजल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्याच विचाराचे होत असत.
छत्रपती शाहू महाराजांनी जसे शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य या क्षेत्राला महत्त्वाचे मानले तसेच छत्रपती शाहू महाराज हे कलेचे, खेळाचे फॅन होते.बालगंधर्व, बाबुराव पेंटर, आबालाल रहिमान, केशवराव भोसले, अल्लादिया खाँ साहेब, अब्दुल करीम खाँ,शंकरराव भोसले, गोविंदराव टेंबे अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना नेहमीच त्यांनी प्रोत्साहन दिले.
छत्रपती शाहू महाराज हे ब्राह्मण विरोधी, मराठा विरोधी होते असे काही वेळा चित्र रंगवले जाते परंतु छत्रपती शाहू महाराज नेहमी म्हणत, स्वराज्य आम्हास पाहिजे. स्वराज्यामुळे आमच्यात चैतन्य उत्पन्न होईल परंतु जोपर्यंत आमच्यामध्ये जातीतील मतभेद आणि मत्सर जिवंत आहे तोपर्यंत आपण आपापसात झगडत राहणार आणि त्यामुळे आम्हाला, आमच्या देशाला अपाय होत राहणार. सुधारण्याच्या चळवळीतील एक उदाहरण नेहमी ते जपान देशाचे देत असत.
जपान देशातील सामोरा या क्षत्रीय वर्णाच्या जातीने त्या देशातील जातिनिर्बंध मोडण्यासाठी पुढाकार घेतला आणि जपानमध्ये या जातीभेदा मधील सर्व गोष्टी नेस्तनाबूत झाल्या. जपानच्या प्रगतीमध्ये याही क्षेत्राचा वाटा दिसून येतो.
शाहू महाराज व महात्मा गांधी, शाहू महाराज व लोकमान्य टिळक, हे नेहमी एकमेकांचा आदर करत असत. देशभक्त अरविंद घोष यांच्यावर ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला भरला. अशावेळी यापासून दूर करण्यात शाहू महाराज पुढे सरसावले.छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची अनुयायी होते.जेव्हा केव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाई तेव्हा ते आदराने त्यांना तिथच मानाचा मुजरा करीत. हा आदरच नित्य मनी असल्याने शिवस्मारकाचे ध्येय त्यांच्याकडून साकार झाले.
छत्रपती शाहू महाराजांकडे गंगाराम कांबळे नावाचे ग्रहस्थ तबेला सांभाळणे, गाड्यांची व्यवस्था करणे या कामासाठी आपली नित्य सेवा करत असत. एकदा काय झाले, गंगाराम यांना तहान लागली त्यांनी पाणी मागितले पाणी तर कोणी दिलेच नाही,उलट स्पर्श केला असा आरोप ठेवून त्यांना मारहाण केली.गंगाराम यांनी ही गोष्ट महाराजांपासून लपवून ठेवली परंतु एक दिवस हे महाराजांना समजले त्यांनी त्या सर्व लोकांना एकत्र बोलावून जे गंगाराम बाबतीत घडले तसेच फटके देऊन त्या लोकांनाही समज दिली. एवढे करून एखादा राजा थांबला असता, परंतु या जाणत्या राजाने पुढे जाऊन गंगाराम यांना स्वतःकडील पैसे देऊन हॉटेल सुरू करण्यास सांगितले. हॉटेल सुरू झाले परंतु गंगाराम यांच्या हॉटेलात कोणी जात नसे, हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आले,तेव्हा राजवाड्यावरून कामाकरता बाहेर पडताना स्वतः महाराज गंगाराम यांच्या हॉटेलात जात. चहा पीत. कधीकधी फक्कड भजी खात. महाराज खातात हे जाणले नंतर इतर लोकांनाही चहा प्यावा लागला, भजी खावी लागली आणि हळूहळू आजूबाजूची मंडळी हॉटेलमध्ये येऊ लागली. गंगाराम हॉटेल नावारूपाला आले.
Rajarshi shahu Maharaj was strong willed man with vision and mission of betterment and upliftment of the socially deprived sections he dedicated his life to this objective and worked tirelessly for the same.
असेच एकदा महाराज कॅम्प कडून निघाले होते तो बाजारचा दिवस होता. खेड्यावरच्या महिला शेतमाल विकायला आणत व त्याच पैशातून आठवड्याचा बाजार करत.अशीच एक दहा-बारा वर्षाची मुलगी रडत रडत रस्त्याने चालली होती. महाराजांचे हे लक्षात आले त्या मुलीला त्यांनी हाक दिली परंतु त्या छोट्या मुलीला समजले नाही.महाराजांनी आपल्या नोकरास तिच्याकडे पाठवले तेव्हा मुलीला विचारले का रडते आहेस?त्या छोट्या मुलीने कारण सांगितले माझ्या डोक्यावर शेणीने भरलेली टोपली आहे ती 7 पैशाला विकून ये नाहीतर तुला मार खावा लागेल. असेच सासूने सांगितले होते त्या मुलीने सर्व बाजारात फिरून ती टोपली विकण्याचा प्रयत्न केला.तिला जास्तीत जास्त 6 पैसे मिळत होते. म्हणून तिने घरचा रस्ता धरला होता.महाराजांनी तिची व्यथा ओळखली तिला पाच रुपये दिले जवळून चाललेला टांगेवाला त्याला बोलावले आणि ती मुलगी आणि नोकर यांना टांग्यात बसून त्या मुलीला घरी सोडण्यास सांगितले.त्या नोकराने घरी गेल्यानंतर ही सर्व हकीकत महाराजांनी स्वतः पाहिली आहे असे सांगितले. त्यावर त्या मुलीला पाच रुपये दिले आहेत हे समजल्यावर सासूला पश्चाताप झाला. ती सरळ महाराजांकडे गेली व महाराजांचे पाय धरून म्हणू लागली मी आज पासून माझ्या सुनेला मारणार नाही. त्रास देणार नाही. महाराज मला क्षमा करा.देव तुमचे भले करो महाराजांनी क्षमा केलीच, परंतु यासारख्या अनेक गोष्टीची त्यांनी उकल केली.
1896-97 प्लेगची साथ असताना कॅम्प पाहण्यासाठी महाराज रस्त्यावरून चालले होते. स्वतः महाराज गाडी चालवत होते. मोठे डॉक्टर त्यांच्याबरोबर होते. निम्म्या वाटेत महाराजांचा हाताला एक शेतकरी उभा होता. त्याने घोंगडीत गाजरे आणली होती. त्याने महाराजांना हात केला आणि गाजरे आणून दिली. महाराजांनी आपल्या आवडीप्रमाणे एका झाडाखाली घोंगडीवर बसून गाजरे खाल्ली. त्यानंतर कामाची पाहणी करत असताना एका माणसाने त्यांच्यापुढे डांगर भाकरी आणून ठेवली. महाराजांनी ती यथेच्छ खाल्ली. बिचारे डॉक्टर हे पहात राहिले.शेवटी त्यापैकी एक डॉक्टर म्हणाले, “महाराज आपली जेवणाची उत्तम व्यवस्था केली आहे आपण कशाला असे डांगर भाकरी, गाजर खात असतात अधिकाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केल्यानंतर त्यांच्या समाधानासाठी दोन घास खाल्ले शेवटी त्यांनी असे सांगितले की, डॉक्टर साहेब तुमचा सल्ला मला आरोग्यासाठी मान्य आहे. परंतु बिर्याणी पेक्षा शेतातील ताजी फळे ताजी डांगर भाकरी अधिक पौष्टिक असते.
छत्रपती शाहू महाराजांचे चरित्रकार बी. एल.पाटील शाहू महाराजांना म्हणाले. मला तुमचे चरित्र लिहायचे आहे परवानगी द्या.त्यावर शाहू महाराज म्हणाले, “हे पहा पाटील लिहिण्यासारखे असे कोणते मोठे कार्य मी केले आहे?” त्यामुळे माझ्या चरित्राची सर्वच पाने तुम्हास कोरी ठेवावे लागतील.त्यावर पाटील म्हणाले, “ते काही का असेना,मला परवानगी द्या. महाराज म्हणाले, माझे चरित्र लिहायचे असेल तर ते माझ्या मृत्यूनंतर लिहा कारण त्यावेळी माझ्या गुणदोषांचे विवेचन तुम्हास मोकळ्या मनाने करता येईल त्यामुळेच शाहू महाराजांचे चरित्र त्यांच्या मृत्यूनंतरच लिहिले गेले.
एकदा महाराज पन्हाळ्यावर होते. एक दिवस वाड्याच्या बाहेर एक व्यक्ती बसून होती. संध्याकाळचे पाच सहा वाजले होते तरीही ती व्यक्ती तिथंच थांबून होती. इतक्या दूर वरून आलेली व्यक्तीचे काय काम आहे? कोण आहेत ते? हे माहिती केल्यानंतर समजले की, त्या व्यक्तीची जमीन जबरदस्तीने दुसऱ्याच्या ताब्यात गेली आहे. त्या खेडूतास महाराजांनी बोलावले, मामलेदार यांना सांगितले,ताबडतोब याची जमीन परत करा.महाराजांनी त्याला जेवण दिले. घोंगडी दिली. पैसे देऊन त्याची रवानगी केली.
महाराजांचे जसे स्वतःच्या धर्मावर प्रेम होते तसेच परधर्मी यावरही तेवढेच ते प्रेम करत. प्रत्येक जातीसाठी त्यांनी वस्तीग्रहे बांधून दिली. वर्षासने दिली.हिंदू-मुसलमान चा नेहमी सलोका असावा यासाठी ते प्रयत्नशील राहिले. कटकोळच्या जवळ फासेपारधी समाजाची वस्ती होती. काहीवेळा त्यांच्याकडून इतर लोकांना त्रास होत असे. महाराजांचा एकदा कटकोळ्यात कॅम्प लावला होता, तेव्हा महाराजांनी या सर्व पारधी समाजाच्या लोकांना पकडून कोल्हापुरास आणले. हे लोक
चोऱ्या दरोडे का घालतात? याची महाराजांनी माहिती मिळवली. बेकारी व दारिद्र्य हे पारधी समाजाचे अधोगतीचे कारण आहे. त्यांना शिक्षा करणे चुकीचे आहे.हे जाणल्यानंतर त्यांच्यातील प्रमुख लाल्या व आरवा यांना राज्यकारभारात पाहऱ्यावर ठेवले. त्यांना शरीर संरक्षक बनवले. पारधी समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली. या प्रकारे संपूर्ण समाजाचा,जगण्याचा नुर त्यांनी बदलून टाकला.
छत्रपती शाहू महाराजांनी वयाच्या 20 व्या वर्षापासून ते वयाच्या 48 व्या वर्षापर्यंत अखंड राज्याची एक प्रकारे लोकसेवा केली त्यांनी केलेल्या कार्याची ओळख आजही महाराष्ट्राला, देशाला, जगाला झाली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे अनुकरण केले व आपली छत्रपती ही पदवी त्यांनी सार्थ करून दाखवली त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख जगभर पसरली होती. केंब्रिज विद्यापीठाने त्याची दखल घेतली. त्यांना एल. एल. डी. हि पदवी बहाल केली.यासारख्या अनेक पदव्या त्यांना बहाल करण्यात आल्या, परंतु जन कल्याणातील, कल्याणकारी कामातून जनसामान्यात त्यांना मिळालेली राजर्षी ही पदवी मानाची ठरली.म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांच्या या अलौकिक, अविस्मरणीय कार्याला, आमचे आजच्या दिनी कोटी कोटी प्रणाम

प्राचार्य.
एन.एन.जाधव.
श्री वर्धमान विद्यालय व
कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर