रस्त्यावर फिरणा-या मनोरुग्णाला मिळाला आधार

दिपक घायाळ /बाळकडू वृत्तसेवा
विंचूर,दि.०५  येथील तिनपाटी भागात गेल्या वर्षभरापासून फिरणा-या मनोरुग्णाला अखेर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवऋण संस्थेचा आधार मिळाला असून, विंचूर येथील युवकांनी पुढाकार घेत दाखविलेल्या संवेदनशिलतेचे परिसरातुन कौतुक होत आहे.
येथील तिनपाटी भागात वर्षभरापासून एक अज्ञात इसम वाढलेली दाढी, अंगावर कपड्यांच्या चिंधड्या आणि कुणी व्यावसायिकांनी दिलेल्या अन्नावर गुजराण करीत होता. जिल्हा परिषदेच्या शाळेसमारील रस्त्यालगतच त्याचे वास्तव्य असल्याने प्रारंभी लहाण मुलांना भिती वाटत. मात्र आपल्यातच व्यस्त असलेल्या या मनोरुग्णाचा कुणाला त्रास होत नसल्याने गेल्या अनेक महिन्पांपासून त्याची दिनचर्या सुरु होती. मात्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील युवकांनी सोशल मिडियाच्या आधारे जुन्नर येथील शिवऋण प्रतिष्ठाणशी संपर्क साधला व मनोरुग्णाबाबद सविस्तर माहिती दिली. सायंकाळच्या सुमारास शिवऋण संस्थेची टिम आल्यानंतर येथील युवकांनी मनोरुग्णाला पुढील देखभालीसाठी त्यांच्या सुपूर्द केले. मनोरुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्यांना समाजात मान ताठ करुन वावरण्यासाठी मदत करणार असल्याचे शिवऋण प्रतिष्ठाणचे संचालक अक्षय बोराडे यांनी यावेळी सांगितले. येथील कर्मवीर कनिष्ठ महाविद्लयाचे प्रा. भरत क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्यराज दरेकर, सौरभ साळी, ऋषिकेश पानसरे, विकास वाघ, हर्षद वझरे, अक्षय थोरात य़ांसह गजराज प्रतिष्ठाणच्या युवा कार्यकर्त्यांनी वर्गणी काढुन अकरा हजार रुपये जमा करत जुन्नरच्या संस्थेकडे देत प्रतिष्ठाणच्या कामाला आर्थिक मदत करीत उपक्रमाला हातभार लावला. गजराज प्रतिष्ठाणच्या या सदस्यांच्या संवेदनशिलतेची दखल घेत कर्मवीर विद्यालयाच्यावतीने सर्वांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सोबत छायाचित्र
विंचूर : येथील मनोरुग्णाला जुन्नर येथील संस्थेच्या पदाधिका-यांकडे सुपूर्द करताना गजराज प्रतिष्ठाणचे युवा कार्यकर्ते.