आगणेवाडीच्या जत्रेसाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक बंद ठेवावी

आगणेवाडीच्या जत्रेसाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक बंद ठेवावी
आमदार रवींद्र फाटक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई उपनगर /बाळकडू प्रतिनिधी , दि.१०, (गणेश शेळके )
मुंबई-गोवा महामार्गावर 27 ते 28 जानेवारी या दोन दिवसांसाठी ये-जा करणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संपुर्ण कोकणाचे आराध्य दैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री आई भराडी देवीच्या अंगणवाडीच्या जत्रेसाठी 27 ते 28 या दिवसात मोठ्यासंख्येने मुंबईतून वाहने मुंबई-गोवा महामार्गावर ये-जा करणार आहेत. यावेळी यात्रेकरुंची आणि अवजड वाहतुक करणार्‍या वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून 27 ते 28 जानेवारी या दोन दिवसात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी ठेवावी अशी मागणी रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील मुंबईत वास्तव्यासाठी असलेला चारकमाणी, अधिकारी, कर्मचारी, राजकीय नेते अशी सर्वच थरातून कोकणातील लोकं मोठ्या श्रध्देने आई भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी अंगणवाडीच्या जत्रेला जात असतात. मुंबई-गोवा महामार्गावर या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. जर अवजड वाहनांना बंदी घातली तर जत्रेसाठी जाणार्‍या भाविकांची गैरसोय होणार नाही आणि व्यापारी वर्गाचे नुकसानही होणार नाही. त्यामुळे आगावू सुचना देऊन अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालावी अशी मागणी आमदार रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तसेच राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करुन सरकारने आंगणवाडीच्या जत्रेसाठी जाणार्‍या भाविकांची गैरसोय होणार नाही याची तसदी घ्यावी अशी विनंती केली आहे. 27 आणि 28 जानेवारी अशी दोन दिवस जत्रा आहे. शिवाय 26 जानेवारीची सार्वजनिक सुट्टी जोडून मिळाली आहे. त्यामुळे संपुर्ण कोकणचे श्रध्दास्थान असलेल्या आई भराडी देवीच्या अंगणवाडीच्या जत्रेला जाणार्‍या वाहनांची संख्या प्रचंड मोठी असेल याचा शासनाने गंभीरपणे विचार करुन दोन दिवस अवजड वाहनांसाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवावा अशा मागणिचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या परिवहन मंत्र्यांनाही आमदार रवींद्र फाटक यांनी दिले आहे.