पुण्यात उमर खालीदला बोलावले कोणी, याची चौकशी व्हायला हवी!….शिवसेनेची मागणी

नाशिक

भीमा कोरेगाव प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करणे चुकीचे असून, मुळात पुण्यातील एल्गार परिषदेला ‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेच्या उमर खालीदला कोणी बोलावून वातावरण तापविले, याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज येथे व्यक्त केले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱयांच्या बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा खासदार संजय राऊत यांनी घेतला, त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. भीमा कोरेगाव प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हिंदुत्ववादी संघटनांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. मुळात पुण्यात एल्गार परिषद कोणी बोलावून वातावरण तापविले, देशाचे तुकडे व्हावे अशी इच्छा असणाऱ्याला बोलावून वातावरण गढूळ केल्याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. महाराष्ट्र जातीपातीत विभागला जात आहे, यामुळे ऐक्य धोक्यात येईल, असेही ते म्हणाले. कोरेगाव प्रकरण हाताळण्यास मुख्यमंत्री सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प हवा
कृषी क्षेत्रासाठी राज्याचा आणि देशाचा स्वतंत्र अर्थसंकल्प असावा, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या आणि देशातील कृषीसंकट यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे वीस दिवसांचे अधिवेशन घ्यावे, ही ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची सूचना चांगली आहे. राज्यकर्त्यांनी याचा विचार करायला हवा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करून शेतकरीहिताचे निर्णय घ्यावेत, असेही ते म्हणाले.

बापट अस्सल पुणेकर…
जे मागायचे ते आताच मागून घ्या, वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे, या अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या वक्तव्यावर टोला हाणताना राऊत म्हणाले की, बापट हे ज्येष्ठ मंत्री आहेत, अस्सल पुणेकर असल्याने ते खरेच बोलतील, त्यांच्या पोटातलंच ओठावर आलंय. या पत्रकार परिषदेप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुहास सामंत, सहसंपर्कप्रमुख भाऊ चौधरी, नाशिक लोकसभा जिल्हाप्रमुख विजय करंजकर, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, नरेंद्र दराडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, महापालिका गटनेते विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जगन आगळे, काशीनाथ मेंगाळ, नीलेश चव्हाण, किरण डगळे, भगवान भोगे, मामा ठाकरे, चंद्रकांत लवटे, सुधाकर बडगुजर, श्याम साबळे, प्रवीण तिदमे, सचिन मराठे, महेश बडवे, शरद देवरे, दीपक खुळे, गोविंद लोखंडे, राहुल ताजनपुरे, सुनील जाधव, सचिन बांडे, योगेश बेलदार, राजेंद्र क्षीरसागर, उमेश चव्हाण, अमोल सूर्यवंशी, नाना पाटील, सुभाष गायधनी, वैभव ठाकरे आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी हजर होते.