लोकसभेसाठी तयारी सुरू, जळगावचा पुढला खासदार शिवसेनेचाच- खा.संजय राऊत

जळगाव 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि जळगावचा पुढचा खासदार शिवसेनेचा असेल, असा पूर्ण विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे, असं राऊत यांनी सांगितलं. जळगाव मनपा निवडणूकही अजेंड्या वर आहे, शिवसेना जळगाव मनपा निवडणूक धनुष्यबान या चिन्हावर लढवणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गिरीष बापट यांनी आधीच भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे असं सांगतानाच युती त्यांनी तोडली मात्र आम्ही युतीचे जन्मदाते आहोत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ खडसे हे भाजपात अस्थिर आहेत, खडसेंबद्दल सहानुभूती दाखवलीच पाहिजे. खडसे फार दिवस भाजपात राहणार नाहीत, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

ज्या गुजरातने भाजपाला पंतप्रधान दिले त्या गुजरातमध्ये भाजपाला विजयासाठी दम लागला. गुजरातमध्ये अहंकार आणि पैशाचा पराभव झाला. शिवसेना सत्तेराहून देखील जनतेसोबत आहे, त्यामुळे आगामी सरकार शिवसेनेचे असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ता बदलणं सोपं असलं तरी सद्यस्थितीत पर्याय नाही, विरोधात राहून तर कुणीही बोलत पण घरात म्हणजे सत्तेत बसून बोलायला धाडस लागतं, असंही ते म्हणाले.

शिवसेना कर्जमाफीवर समाधानी नाही!

कर्जमाफी झाली नाही तर भूकंप होईल असं आम्ही म्हणालो होतो त्यानंतर २४ तासातच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहिर केली, असा दाखलाही त्यांनी दिला.