२५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

बाळकडू | मुंबई

शिवतीर्थ दि.१८ :-

जनतेला दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, राज्यातील दुष्काळी परिस्थिती या सर्व मुद्द्यांवर त्यांनी केंद्र आणि राज्यातल्या सरकारला घेरलं. राम मंदिर प्रश्नी शिवसेना आता आक्रमक झालेली आहे.

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचा जोरदार समाचार घेतला. जनतेला दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, राज्यातील दुष्काळी परिस्थिती या सर्व मुद्द्यांवर त्यांनी केंद्र आणि राज्यातल्या सरकारला घेरलं. दरम्यान, राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना स्वतःच्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

”सरसंघचालकांचं अभिनंदन”

राम मंदिर प्रश्नी सरसंघचालक मोहन भागवत यांनी जी भूमिका घेतली, त्याचंही उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं. खोटं बोलून जनतेला फसवत असाल, तर हा एक ज्वालामुखी आहे आणि तो ज्या दिवशी फुटेल, त्या दिवशी सरकार जवळपासही येणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिला.

अयोध्येत पहिल्यांदा येतोय, तो तुम्हाला आठवण करुन देण्यासाठी. पण त्यानंतर आम्ही तमाम हिंदूंना एकत्र घेऊन येऊ आणि राम मंदिर बांधू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही राम मंदिर उभारु शकत नसाल, तर हे एनडीएचं सरकार नाही, तुमच्या डीएनएतच काही तरी प्रॉब्लम आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

”तुमच्याकडे विष्णूचा अवतार असूनही महागाई का रोखता येत नाही?”

वाढते इंधन दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि महागाईवरुन उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली. तेलाचे दर कमी करणं आमच्या हातात नाही, असं रवीशंकर प्रसाद यांनी मग्रुरपणे सांगितलं. मग तुमच्या हातात आहे तरी काय? तुमच्याकडे विष्णूचा अवतार असूनही महागाई रोखता येत नाही का? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या #MeToo या महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरु असलेल्या मोहिमेलाही उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला. मी टू मी टू करत बसण्यापेक्षा कानाखाली द्या, असं ते म्हणाले.