राम मंदिर बांधा, नाही तर जुमला म्हणून जाहीर करा! उद्धव ठाकरेंचे आव्हान; २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार

बाळकडू । मुंबई (सौजन्य दैनिक सामना)

”येत्या २५  नोव्हेंबरला मी अयोध्येत जाणार आहे. हेच प्रश्न जे मी इथे विचारले ते अयोध्येत जाऊन मोदींना विचारणार आहे”,असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्यातून जोरदार हल्लाबोल केला. ‘बाबरी पाडलेल्यांना फाशी देऊन तुम्ही राम मंदिर बांधण्याचं श्रेय घेऊ शकत नाहीत’ असा खणखणीत इशारा देत ‘राम मंदिर बांधा, नाही तर जुमला म्हणून जाहीर करा’, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना दिलं. महाराष्ट्राची सास्कृतिक परंपरा असलेल्या शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांच्या अती विराट जनसमुदायाला मार्गदर्शन करताना, उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, वाढती महागाई, नोटाबंदीचे परिणाम, महाभयंकर दुष्काळ, राम मंदिर, हिंदूंच्या सणांवेळी येणारी बंदी या ज्वलंत प्रश्नांवरून भाजप सरकारवर जबरदस्त तोफ डागली. उद्धव ठाकरेंच्या तुफानी भाषणावेळी शिवसैनिकांनी टाळ्या, शिट्या आणि शिवसेना झिंदाबाद, जय भवानी- जय शिवाजी अशा घोषणादेत तितकाच जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळे राजकीय सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा विक्रम मोडणारा असा आजचा दसरा मेळावा ठरला.

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘दरवर्षी प्रमाणे आज ही रावण उभा आहे. मात्र आज त्याचं स्वरुप जरा वेगळं आहे. सिलिंडर आहे, पेट्रोल पंप आहे हे काही नवीन नाही. दरवर्षी दसरा म्हटलं की रावण दहन आलंच पण विशेष म्हणजे सरकार कुणाचंही येऊ द्या, पंतप्रधान-मुख्यमंत्री कुणीही असून द्या दरवर्षी रावण आपला उभाच. रावण वध होऊन कित्येक शतकं लोटली पण दरवर्षी रावण उभा राहतो पण आमचं राम मंदिर उभा राहत नाही. ही आम्हाला एक खंत आहे. हा आम्हाला एक राग आहे. हा आम्हाला संताप आहे’, असं ते म्हणाले.

‘ज्यावेळात हिंदू आणि हिंदुत्व बोलताना सुद्धा बोबडी वळत होती त्या काळात एक आणि एक मर्दच होते ते म्हणजे आपले शिवसेनाप्रमुख. जे नुसतं घरातल्या घरात नाही तर मैदानात सुद्धा बोलत होते गर्व से कहा हम हिंदू है, अशा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर आपल्या धारदार शब्दांनी त्यांनी भाजप सरकारवर सडतोड टीका केली.

देशभरात उसळलेल्या दंगली असतील, अमरनाथ यात्रा असतील एकमेव मर्द असा होता की सत्तेचं पद नाही, पोलीस नाही, पण हे तुमचं सैन्य, या ताकदीवरच त्यांनी मुंबई, महाराष्ट्रातला, देशातला हिंदू वाचवला, हिंदू चेतवला, हिंदू उठवला आणि तिच हिंदुत्वाची ताकद, तिच हिंदुत्वाची वज्रमुठ तिची जबाबदारी, ही परंपरा मी नम्रपणानं पुढे घेऊन जातो आहे’, असं म्हणत त्यांनी तमाम हिंदूंच्या मनात चैतन्य जागवलं.

अनेक जणं आले, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही करतील, करून बघाच. माझं तर आव्हानच आहे या शिवतीर्थावरून की आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून बघाच शिल्लक कोण राहतंय ते आपण बघुया, असं म्हणताच शिवसेना झिंदाबादच्या जोरदार घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

‘आजही पंतप्रधान तिकडे गेले असतील दिल्लीमध्ये. तिथे धनुष्यबाण सोबत लागेल. म्हणजे आमची गरज लागणारच. युद्ध लढायला तुम्हाला आम्हीच लागणार. धनुष्यबाण आमचाच आहे. कारण ते धनुष्य हातात धरण्यासाठी सुद्धा मर्द असावा लागतो आणि तो मर्द माझ्या शिवसेनेमध्ये आहे. धनुष्यबाण पेलायला छाती किती इंचाची ते महत्वाचं नाही, तर मनगटात जोर किती आहे ते बघावं लागतं आणि त्या मनगटामध्येच धनुष्यबाण शोभतो‘, असा सणसणीत टोला त्यांनी यावेळी लगावला.

uddhav-shivtirth

‘मंदिर वहीं बनाएंगे, लेकीन तारीख नहीं बताएंगे। मंदिर करता आहेत की नाही ते आम्हाला सांगा. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला. त्यावेळी टाळ्या आणि शिट्यांनी समुदायानं प्रतिसाद दिला. अनेकदा तुमच्या सभा झाल्या, रथ यात्रा झाल्यात, विटा गोळा करून झाल्या आहेत. हिंदूंनी बाबरी पाडली. पण मंदिर कधी बांधणार ते माहिती नाही. राष्ट्रपती पदाची निवडणूक आली की बाबरीची केस वरती येते, कारण अडवाणी राष्ट्रपती होतील. मग आडवाणींना अडकवायचं असेल तर बाबरीची केस काढा. बाबरी पाडलेल्यांना फाशी देऊन तुम्ही राम मंदिर बांधण्याचं श्रेय नाही घेऊ शकत. एक राम मंदिर बांधायचं असेल तर ज्यांनी बाबरी पाडली त्यांच्या शौर्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जे अनेक कारसेवक तिथे मारले गेले, गळ्यात धोंडा अडकवून त्यांना शरयू नदीमध्ये डुबवण्यात आलं त्यांच्या बलिदानाची किंमत ठेवा आणि म्हणून मी अयोध्येला जाणार आहे. मी ठरवलं आहे. कारण त्यावेळाला सुद्धा सगळी सामसूम झाली होती. शेपट्या आत घालून सगळे पळाले होते. आज जे छाती काढून पुढे येताहेत ते बाबरी पाडल्यानंतर बिळात जाऊन लपले होते आणि जो काही देशद्रोह्यांचा एक आगडोंब उसळला होता त्याला या मर्द शिवसैनिकांनी आवर घातला होता. एकदा स्पष्ट होऊ द्या, अच्छे दिन जसा जुमला होता, प्रत्येकाच्या बँक अकाऊंटमध्ये 15 लाख रुपये टाकणार हा एक जुमला होता तसं एक तर राम मंदिर बांधा नाहीतर निर्लज्यांनो राम मंदिर हा सुद्धा एक जुमला आहे म्हणून जाहीर करून टाका, असा सणसणीत हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

‘सध्या देशाच्या राशीत वक्री झालेले शनी आणि केतू आहेत. ते कोण आहेत ते तुम्हाला माहीत आहे. त्या वक्री झालेल्या ग्रहांना सरळ करण्याची ताकद फक्त माझ्या शिवसेनेत आणि शिवसैनिकांमध्ये आहे’, असा जबरदस्त विश्वास त्यांनी व्यक्त केला.