कुरवली प्राथमिक शाळेत महाभोंडला जल्लोषात साजरा

बाळकडू | पुणे

कुरवली ता.इंदापूर दि.१७/१०/२०१८ :-

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी ||

अक्कण माती, चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई, जातं ते रोवावं||

आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी,
आडात पडली सुपारी, आमचा भोंडला दुपारी. ||

या अशा भोंडल्याच्या गाण्यावर कुरवलीतील महिला व मुलींनी फेर धरून भोंडला जल्लोषात साजरा केला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.  हस्त नक्षत्राचे प्रतिक हत्तीची पुजा करून भोंडल्याचा फेर धरला. कुरवली प्राथमिक शाळेतील मुली, माता पालक व ग्रामस्थ महिलांनी या भोंडल्याचा आनंद घेतला. त्याचबरोबर महिलांसाठी  संगीत खुर्ची, चमचा लिंबू, गरबा गाणी व टिपरी नृत्य  घेण्यात आले.  शाळेतील मुला-मुलीनी लेझीम कौशल्य दाखवून उपस्थितांची वाहवा मिळविली. याचबरोबर “लेक वाचवा, लेक शिकवा” हा सामजिक संदेश देखील देण्यात आला.

या महाभोंडल्या साठी कुरवली गावातील शंभराहून जास्त महिलांनी सहभाग घेतला. तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. कुरवली केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब आडके यांच्यासह सरपंच शोभा पांढरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता डुबल, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, माता पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन जि.प.प्राथमिक शाळा कुरवली या शाळेने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी  मुख्याध्यापिका ज्योती धावणे, सहशिक्षिका विद्या गोसावी यांनी परिश्रम घेतले.  अंगणवाडी सेविका कदम मँडम व सेविका गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

शाळेची शैक्षणिक प्रगती व विविध उपक्रमामुळे पालक वर्ग समाधानी असल्याचे दिसून आले. पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम होत असल्याचे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या.