‘आयमेथॉन २०१८’ मॅरेथॉनला कल्याण मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

बाळकडू | शहाजी घाग
कल्याण दि.२७/११/२०१८
लष्करातील जवान, आंतरराष्ट्रीय धावपटू यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या आयमेथॉनची चांगलीच चर्चा रंगली. इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रनर्स ग्रुपतर्फे ही शर्यत आयोजित केली होती. रशियातून आलेला आंतरराष्ट्रीय धावपटू, तब्बल १२० मॅरेथॉनमध्ये धावलेले विठ्ठल कांबळे आणि ७५ वर्षांचे आजोबा हे तिघे या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले.
कल्याण पश्चिमेकडील वसंत व्हॅली खडकपाडा येथे मोहन अल्टिझापासून सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या शर्यतीतील १० किलोमीटर त्यानंतर ५ किमी, ३ किमी आणि सर्वात शेवटी दीड किलोमीटर अंतराचे स्पर्धक धावले. त्यातील १० किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये पुरुष गटात लष्कराच्या किरण कुमार यांनी पहिला, रशियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू अंटोन बेलाकोव्हने दुसरा आणि वसीम शेखने तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात मनीषा पांडे यांनी प्रथम, प्रशांत तोष्णीवाल यांनी द्वितीय आणि डॉ. तृप्ती बोबडे यांनी तृतीय येण्याचा बहुमान पटकावला. लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत अनेक स्पर्धक अतिशय उत्साहात सहभागी झाले होते.
इंडियन सायक्रॅटिस सोसायटीचे सदस्य आत्महत्यारहित तणावमुक्त जीवनाचा संदेश घेऊन या शर्यतीत धावले. ज्येष्ठ नागरिक, व्यसनाधीन व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनतून जमा झालेले तब्बल १ लाख रुपयांच्या निधीबरोबरच इंडियन सायक्रॅटिस सोसायटीतर्फे २१ हजारांचा धनादेश दिशा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्याचे कल्याण आयएमए सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.
शहाजी शिवाजी घाग
कल्याण तालुका प्रतिनिधी
८१०८३८२५६१