उद्धव ठाकरे यांच्या आश्वसानानंतर मराठा बांधवांचे उपोषण मागे

बाळकडू | दि.२९/११/२०१८

सौजन्य सामना

मुंबई  :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील मराठा क्रांती मोर्चाने आपले उपोषण मागे घेतले आहे. तशी घोषणाच मराठा मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे. तसेच मराठा मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

मराठा आरक्षण जरी मिळाले तरी अद्याप 13700 आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, अजूनही अटक सत्र थांबले नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी सांगितले. हे अटक सत्र थांबून शहीदांच्या कुटुंबीयांपैकी एकाला सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी या मागण्या पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याची घोषणा जावळे पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे राज्यात आनंदाचे वातावरण असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच हे आरक्षण मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी दिलेल्या लढ्यामुळे मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू व शिवसेना तुमच्या पाठीशी ठाम उभी असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.