मराठा समाजाला १६ टक्के दिलेले आरक्षण हा युती शासनाचा ऐतिहासिक निर्णय- शंभूराजे देसाई

बाळकडू वृत्तसेवा

कराड दि.२९/११/२०१८ 

महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेले राज्यातील सकल मराठा समाजाचे गत दोन वर्षापासून मागणी असणारे मराठा आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजुर झाले असून भाजप शिवसेना युतीच्या सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला १६ टक्के दिलेले आरक्षण हा युती शासनाने घेतलेला हा एैतिहासिक निर्णय आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला न्याय मिळाला असून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकेल आणि तेही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही, असे आरक्षण युतीच्या शासनाने मिळवून दिले असून याचा आम्हास खुप आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाईंनी दैनिक सामना प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.

आमदार शंभूराज देसाई म्हणाले,गत दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाजाला योग्य असे मराठा आरक्षण मिळावे अशी राज्यातील सकल मराठा समाजाची मागणी होती. या मागणीकरीता संपुर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आंदोलने करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले. राज्य मागसवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झालेनंतर कायदयाच्या चौकटीत टिकेल आणि इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का पोहचणार नाही असा कायदा विधीमंडळाच्या याच अधिवेशनात करण्यात येईल अशी जाहीर ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती त्यानुसार आज रोजी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचेसंदर्भातील राज्य मागसवर्ग आयोगाचे अहवालावरील कृती अहवाल (एटीआर) विधेयकाच्या माध्यमातून शासनाकडून विधानसभेत मांडण्यात आला आणि तो एकमताने मंजुर देखील करण्यात आला.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधीमंडळात समंत झालेनंतर महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाजाने संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आनंदोत्सव साजरा केला याचा अत्यानंद होत आहे. भाजप- शिवसेना युतीच्या शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घेतलेला धोरणात्मक निर्णय हा एैतिहासिक असा निर्णय आहे. हा एैतिहासिक निर्णय घेतलेबद्दल मी माझे पाटण विधानसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या वतीने युतीच्या महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आणि विशेष असे आभार मानतो.या एैतिहासिक निर्णयामुळे सकल मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणांचा आणि नोकऱ्यांचा गंभीर असा प्रश्न आता सुटणार आहे. याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केली आहे.