विजय औटी : लढाऊ बाण्याचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व

बाळकडू | विजय रासकर (नगर जिल्हा प्रतिनिधी)

सौजन्य सामना

विजय भास्करराव औटी नगर जिह्यातील पारनेरसारख्या दुष्काळी आणि राजकीयदृष्टय़ा खडतर असलेल्या तालुक्यातून सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून येणारे एकमेव आमदार. त्यांचे वडील भास्कर औटी यांनी कम्युनिस्ट पक्षातर्फे दोन वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले. पारनेरची दुसरी ओळख म्हणजे सेनापती बापट आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा हा तालुका नेहमी चळवळींचे केंद्र राहिला. विजय औटी यांची कारकीर्द 1975च्या सुमारास विद्यार्थी चळवळीतून सुरू झाली. 1977 मध्ये सरकारी कर्मचाऱयांचा 52 दिवसांचा संप झाला. या संपाच्या बाजूने उभे राहिल्याने औटी यांना विसापूर कारागृहात तुरुंगवास भोगावा लागला. याचदरम्यान तालुक्यात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी मुख्यमंत्री निधीतून भरावी यासाठी मोठे आंदोलन केले. तेव्हापासून आंदोलने आणि चळवळीत राहिलेले औटी 1985 मध्ये जिल्हा परिषदेत निवडून आले. पारनेरमध्ये दुष्काळ अजून पाचवीला पुजलेला आहे. अशा तालुक्यात दुष्काळी कामे, शेती, पाण्याचे प्रश्न याच बरोबरीने शैक्षणिक कार्यातही त्यांनी पुढाकार घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे ते सदस्य झाले. पुढे समता विकास मंडळाच्या माध्यमातून विनायक विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढविली. 2004 मध्ये शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवून ते विधानसभेत आले. विधानसभेतील त्यांची कारकीर्द गाजली. अभ्यासू आणि संसदीय आयुधे मांडणारा आमदार म्हणून उभ्या सभागृहाला त्यांची ओळख झाली. मतदारसंघात दुष्काळी जलसंधारणाची कामे करण्यात त्यांचा मोठा पुढाकार राहिला. मनकर्णिका ही मृत झालेली नदी, तिचे पुनरुज्जीवन जलसंधारणाच्या कामातून औटी यांनी केले. या कामाने प्रभावित होऊन या कामाची दखल शेतकरी कामगार पक्षाने घेतली. शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या या कामासाठी शेतकरी कामगार पक्षाने मोठी देणगी दिली. एखाद्या आमदाराच्या कामासाठी दुसऱया पक्षाने देणगी देण्याचे हे एकमेव उदाहरण असेल. औटी यांनी आपल्या कामातून ते सिद्ध केले. एवढेच नव्हे विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा पारनेर हे मतदारसंघाचे नाव बदलण्यात आले. पारनेरकरांसाठी हा अस्मितेचा प्रश्न होता. दोन वर्षे लढा देऊन निवडणूक आयोगाकडून त्यांनी पारनेर हे नाव परत मिळवले. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मदत त्यांना झाली. त्यांचा हा लढाऊ बाणा राज्याने पाहिला.

नगर हा तसा राजकीयदृष्टय़ा जागरूक आणि प्रभावी जिल्हा; परंतु औटी यांनी पारनेरच्या माध्यमातून राजकारणाचा वेगळा ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. शांत, संयमी, परंतु हक्कांच्या प्रश्नांसाठी तेवढेच आक्रमक असलेले विजय औटी हे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण करतील.