यंदा डोंबिवलीत रंगणार श्रीनिवास मंगल महोत्सव

बाळकडू | शहाजी घाग

कल्याण दि.३०/११/२०१८

भाविकांच्या अडचणी लक्षात घेऊन तिरुमला तिरुपती देवस्थानाने विविध ठिकाणी तिरुपती बालाजी दर्शन सोहळा आयोजित करण्यास सुरवात केली आहे. श्रीनिवास मंगल महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यापूर्वी तिरुमला तिरुपती देवस्थानने विरार, वसई, मीरारोड, बोईसर, नालासोपारा आदी ठिकाणी मंगल महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन केले होते. यावर्षी श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या आयोजनाचा मान डोंबिवली परिसराला मिळाला आहे. शनिवार, १ डिसेंबर रोजी ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली (पू.) येथे सोहळा संपन्न होणार आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान आणि ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या सोहळ्यात तिरुपती बालाजी येथे नियमित होणारे पूजा – अर्चा तसेच इतर धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. सोहळ्यामुळे आपल्या परिसरातील श्री तिरुपती बालाजींच्या दर्शनापासून वंचित राहिलेल्या भाविकांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. या महोत्सवामध्ये देवदेवतांचे फोटो असलेले विद्युत देखावे डोंबिवली आणि कल्याण परिसरात विविध ठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे घरडा सर्कल तसेच डोंबिवली स्टेशनपर्यंत विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

महोत्सवासाठीचे हे सर्व देखावे आणि विद्युत रोषणाई चेन्नईहून येणार आहेत. आज ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी तिरुपतीहून देव कल्याणफाटामार्गे बालाजी मंदिर सागर्ली येते आणण्यात येणार आहेत. या मंगल महोत्सवामध्ये १ डिसेंबर रोजी सकाळी सुप्रभात, तोमाला सेवा, सकाळी १० ते १२ वाजता कुंकुमार्चनम, तसेच तुलाभार करण्यात येणार आहे. यावेळी या वर्षामध्ये विवाह झालेल्या सुमारे एक हजार जोडप्यांना अभिषेकाचा मान मिळणार आहे. दुपारी ३ ते ६ पर्यंत श्रीनिवास मंगल महोत्सवाची भव्य शोभायात्रा विठ्ठल मंदिर आयरे रोड पासून स्वामी विवेकानंद शाळा-दत्त नगर चौक-संगीतावाडी मार्गे मानपाडा रोड-चार रस्ता-टिळक चौक-शेलार नाका ते घारडा सर्कल पासून सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, अशी डोंबिवलीच्या सांस्कृतिक परंपरेला शोभणारी काढण्यात येणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती

श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या कार्यक्रमाची उत्सुकता सर्वांनाच असून या श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील विविध मान्यवर हा अनुपम सोहळा पाहण्याकरिता उपस्थित राहणार आहेत. हा मंगल महोत्सव संपन्न करण्याकरिता सर्वच समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतलेला आहे. या मंगल महोत्सवामध्ये सुमारे अडीच लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि आमदार सुभाष गणू भोईर आहेत.

शहाजी शिवाजी घाग

कल्याण तालुका प्रतिनिधी