नाशिक मनपा देणार दिव्यांगांना अर्थसहाय्य

वैशाली पवार ( बाळकडू , नाशिक जिल्हा प्रतिनिधी )
     ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन नाशिक महानगर पालिका शहरातील १० दिव्यांगांना अर्थसहाय्याचे धनादेश वाटप करण्यात येणार आहे . तसेच सार्वजनिक वाचनालय नाशिक व शासकीय अंधशाळा यांना प्रायोगिक तत्त्वावर स्कॕनिंग आणि रिडिंग मशिनचे वितरण करण्यात येणार आहे .
         नाशिक मनपा मध्ये राज्य सरकारच्या निर्देशानुसार अपंगांसाठी विशेष राखीव निधीची तरतुद केली आहे . या निधीचा विनियोग व वाटप होण्यासाठी दिव्यांगांनी आंदोलन केले होते . यानंतर महापालिकेने याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे ठरविले आहे .
        राज्य सरकारने ठरवून दिलेल्या आठ योजनांसाठी नाशिक महानगरपालिका खर्च करणार असुन यामध्ये कर्णबधिरांसाठी शस्त्रक्रियेस अर्थसहाय्य , दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य , दिव्यांगांना शिक्षण – प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य , शिष्यवृत्ती व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य , मनपा क्षेत्रातील संस्था व संघटनेच्या सक्षमीकरण करणे अशा स्वरुपातील योजनांचा यात समावेश आहे .
        दिव्यांगांसाठी असलेल्या आठ योजनांसाठी नाशिक शहरातुन दोनशे अर्ज दाखल झाले असुन त्याची छाननी करण्याचे काम सुरु आहे . त्यातील दहा लाभार्थ्यांना पहिल्या  टप्प्यात अर्थसहाय्य करण्यात येणार आहे .