लासलगाव च्या अति प्राचीन श्री भैरवनाथ मंदिराचे काम पूर्णत्वाकडे

लासलगाव(शहर प्रतिनिधी)समीर पठाण

गोदातीरी वासियांच्या रक्षणार्थ महादेव भगवान शंकर यांच्या इच्छे नुसार प्रकट झालेली देवता श्री भैरवनाथ, काशीचा कोतवाल,श्री कालभैरव तीच महाराष्ट्राच्या गावोगावी गावक-यांचे रक्षण करणारी देवता श्री भैरवनाथ.अशा या लासलगाव च्या अती प्राचीन श्री भैरवनाथ मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाच्या वाटचालीकडे जात आहे.

लासलगाव चे जेष्ठ गांवकरी या मंदिराबद्दल सांगतात कि,पुर्वीच्या काळात जेव्हा लासलगाव व परिसरात वैद्य,डाॅक्टर उपलब्ध नव्हते,तेव्हा कोणाला सर्पदंश झाला तर त्या व्यक्तीला लिंबाच्या पाल्यात गुंडाळून या मंदिरात आणुन ठेवत असे,थोड्याच वेळात त्याचा त्रास व  दाह कमी होऊन ती व्यक्ती उठुन बसत असे. या मंदिराच्या अंगणातील माती सुध्दा तेव्हा नागरिक सर्पबाधा होऊ नये म्हणून भस्म म्हणुन वापरत.
या दिव्य मंदिराची अवस्था अतिशय जीर्ण झाली होती,या मंदिराचे स्वरुप पडके झाल्या मुळे या कडे दुर्लक्ष झाले होते. काही तरूण वारंवार या गोष्टी ची जाणिव गावक-यांना करून देत होते आणि शेवटी सर्व गावकरी तसेच समाजातील सर्व प्रतिष्ठीत मंडळींनी याची दखल घेतली.

श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज आणि लासलगावातील सर्व पुरोहित वर्गाच्या अधिपत्या खाली,सर्व घटकातील,सर्व पक्षातील,सर्व समाजातील मान्यवरांनी एकत्र येऊन सर्वांच्या उपस्थितीत भाद्रपद शु प्रतिपदा, दि.१० सप्टेंबर २०१८ रोजी या पुरातन पावन श्री भैरवनाथ मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या पवित्र कार्याला सुरुवात झाली.

श्री भैरवनाथ देवतेच्या पुरातन पवित्र मुर्तीचे तेज एका पवित्र कलशात संक्रमित करण्यात आले. तो तेजोकलश जवळच असलेल्या श्री दत्त मंदिरात ठेवण्यात आला.श्री गुरुदेव दत्त म्हणजे साक्षात ब्रम्हा विष्णू,महेश म्हणुनच तो तेजोकलश मुर्तीच्या शेजारील उत्तर दिशेला म्हणजे महादेवाच्याच बाजुला ठेवण्यात आला.भाविक श्री गुरुदेव दत्तांना भक्तिभावाने नमस्कार करताना त्या तेजोकलशाला सुध्दा रोज नमस्कार करतात. सर्व साधारण पणे सार्वजनिक काम हे खुप संथ गतीने चालते परंतु या ठिकाणी तसे न होता काम झटपट होत गेले. दि २ नोव्हेंबर २०१८ रोजी म्हणजे दोनच महिन्यात या जागृत भैरवनाथ मंदिराचा स्लॅब पुर्ण झाला. मंदिराचे काम आता कळसा पर्यंत आले असुन काम उत्कृष्ट तर आहेच डोळे दिपवणारे देखील आहे. या श्री भैरवनाथ देवतेची जागृतता,या मंदिराची भव्यता इतकी आहे कि येथून जाणारा भक्त या ठिकाणी दर्शन घेऊन नतमस्तक झाल्या शिवाय पुढे जाऊ शकणार नाही.

या मंदिराचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात शिल्लक राहिले असुन लवकरात लवकर ते पुर्ण करण्याचा चंग येथील तरुणांनी बांधला आहे. येत्या ८ जानेवारी विवेकानंद जयंती पर्यंत ते पुर्ण करण्याचा सर्व तरूणांचा मानस आहे.ज्या भाविक भक्तांना या धार्मिक कामात आर्थिक मदत सहकार्य करायचे असल्यास ९९२१५४५९९७ या क्रमांकवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.