यवतमाळ जिल्ह्यातिल बंजारा समाजाची( काशी )देवस्थान पोहरादेवी येथे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती  मध्ये भूमिपूजन

बाळकडू | संतोष चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी)

यवतमाळ दि.३/१२/२०१८

यवतमाळ जिल्ह्यातिल बंजारा समाजाची( काशी )देवस्थान पोहरादेवी येथे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती  मध्ये भूमिपूजन करण्यात आले व लाखोंच्या संख्येने बंजारा समाज उपस्थित होता.

मोठय़ा संघर्षानंतर मराठा समाजाला न्याय मिळाला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन! आता बंजारा, धनगर समाजाचेही प्रश्न सोडवा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. बंजारा समाज हा लढवय्या आहे. त्यांच्या मागण्याही माफक आहेत. तांडय़ांवर शिक्षणाची सोय झाली तर हा समाज देशाचा आधारस्तंभ होईल असा आत्मविश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागड येथे संत सेवालाल मंदिर परिसरात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला संत डॉ. रामराव बापू, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री दादा भुसे, रणजीत पाटील, शिवसेना खासदार भावना गवळी, प्रतापराव जाधव, आमदार गोपीकिशन बाजोरिया आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्यमंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या अनेक मागण्या मांडल्या.

‘जय सेवालाल’ अशी भाषणाची सुरुवात करून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व बंजारा समाजाचे अतूट नाते असल्याचे सांगितले. संत सेवालाल यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा प्रबोधनकार ठाकरे यांनी घेतला. हाच क्रांतीचा विचार घेऊन आम्हीही पुढे जात आहोत असे सांगून उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. बंजारा समाज हा लढवय्या आहे. संत सेवालाल यांनी इंग्रजी आमदनीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या समाजाला लढाऊ बाण्याची शिकवण दिली. स्वाभिमान हा बंजारा समाजाच्या रक्तातच आहे. प्रसंगी तलवार घेऊन लढा, पण लाचारीचे जिणे जगू नका ही आत्मविश्वासाची शिकवण सेवालाल महाराजांनी बंजारा समाजाला दिली आहे. संत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचेच नव्हते तर ते संपूर्ण जगाचे होते, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

बहुतांश बंजारा समाज आजही तांडय़ावर वस्ती करून आहे. येथेही माणूसच राहतो. त्यांच्यातील शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शिक्षणाची सोय झाल्यास बंजारा समाज देशाचा आधारस्तंभ होईल असा आत्मविश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. हे सोपे नव्हते. त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन ! आता बंजारा, धनगर समाजालाही न्याय मिळाला पाहिजे अशी मागणीच यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

 

संत सेवालाल स्मारकासाठी 100 कोटी रुपये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना पोहरागड येथील प्रस्तावित 125 कोटींच्या आराखडय़ातील 100 कोटी रुपये मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा केली. ज्या पवित्र भूमीत संत सेवालाल यांनी समाधी घेतली त्या ठिकाणी त्यांची महती सांगणारे नंगारा वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार असून बंजारा संस्कृतीचे जतन करण्यासाठी बंजारा अकादमी उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे आमचे मार्गदर्शक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे मार्गदर्शक आहेत. बंजारा समाजाच्या विकासाबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस हे आज प्रोटोकॉल मोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. एवढेच नाही तर कार्यक्रमस्थळी जाताना मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे हे एकाच गाडीने गेले.