नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली

वैशाली पवार ( बाळकडू , नाशिक जिल्हा प्रतिनिधी )
      नाशिक जिल्ह्यात यावर्षी पावसाने ओढ  दिल्यामुळे दुष्काळी झळा डिसेंबर महिन्यातच जाणवू लागल्या आहेत . यापुर्वीच शासनाने आठ तालुके आणि सोळा महसुल मंडळांना दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहे . नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भाग पाणीटंचाईचा सामना करत असुन शासनाने आता पाणीपुरवठ्याकडे लक्ष केंद्रित केले आहे .
        डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील  सात तालुक्यांतील ३७६ गावे व वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे . भुजल पातळी घटत चालल्यामुळे विहीरी व पाण्याचे स्रोत कोरडे पडत चालले आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील जनेतेची पाण्यासाठी वणवण सुरु झाली आहे .
        या परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासनानेही कंबर कसली असुन मागणी होईल तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे . मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एकही टँकर ची मागणी नव्हती मात्र यंदा दुष्काळाची तिव्रता अधिक जाणवत आहे .
         सध्या सिन्नर तालुक्यातील १५४ गावे व वाड्यांना सर्वाधिक २८ टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे . येवला तालुक्यातील ६२ गाव व वाड्यांना २४ टँकर द्वारे , मालेगाव तालुक्यातील ८१ गाव व वाड्यांना २२ टँकर द्वारे , नांदगाव तालुक्यातील ४४ गाव व वाड्यांना ७ टँकर द्वारे , सटाणा तालुक्यातील २० गाव व वाड्यांना १५ टँकर द्वारे , देवळा तालुक्यातील १३ गाव व वाड्यांना ४ टँकर द्वारे , चांदवड तालुक्यातील २ गावांना १ टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे  .
      एकुणच डिसेंबरमध्येच ओढावलेली हि परिस्थिती बघता भविष्यात नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची तिव्रता अधिकच जाणवू लागेल असे चित्र दिसत आहे .