नाशिक जिल्ह्यात राबवला जाणार वैरण विकास प्रकल्प 

वैशाली पवार ( बाळकडू , नाशिक जिल्हा प्रतिनिधी )
       नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे . या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अभुतपुर्व चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नाशिक जिल्हा प्रशासनाने दीड हजार हेक्टर गाळपेरा क्षेत्रावर वैरण विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे . या प्रकल्पासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून अवघा एक रुपया  भाडे आकारण्यात येणार आहे .
       जिल्ह्यातील अनेक जलसाठे  आटले असुन त्यामुळे गाळपेरा जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत . गाळपेरा जमिनीवर घेण्यात येणाऱ्या वैरण विकास प्रकल्पासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे व जलाशयातील पाणी विनामुल्य उपलब्ध करुण दिले जाणार आहे . मात्र या जमिनीवर केवळ चारा पिकाचे उत्पादन घेणे लाभार्थी शेतकऱ्यांनी बंधनकारक आहे अशी माहिती शासकीय स्तरावर देण्यात आली आहे .
        वैरण विकास प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून संबंधित तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे १२ डिसेंबर पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत . १४ डिसेंबर रोजी तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड  करुन  यादी जाहीर करण्यात येणार असुन १७ डिसेंबर रोजी निवड झालेल्या लाभार्थ्यांना बियाणे वाटप करण्यात येणार आहे . हा प्रकल्प दुष्काळाच्या कालावधी साठी मर्यादित असणार आहे . शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .