सीईओ च्या निषेधार्थ बाजार बंद

गौरव नासरे, कारंजा तालुका प्रतिनिधि.
कारंजा(घा.)-
कारंजा नगर पंचायत च्या नगर पंचायत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) पल्लवी राऊत यांच्या बाजार व्यावसायिक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व्यावसायिकांनी रविवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलिस प्रशासन व नागरिकांच्या मध्यस्थीने आणि सीईओ यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर सकाळी ७ वा. पासून भरणारा आठवडी बाजार तब्बल ५ तास उशिरा म्हणजे १२ वा. पासून चालू झाला.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम राबवत असताना शनिवारी सायंकाळी मुख्याधिकार्यांच्या आदेशावरून नगर पंचायत च्या कर्मचार्यांनी आठवडी बाजारातील कच्चे ओटे तोडले. आणि व्यावसायिकांना बाजार मांडण्यासाठी १० बाय १० ची जागा देऊ केल्याचे सांगितले.
दुसर्या दिवशी आठवडी बाजार असल्याने हे काम सोमवार पासून सुरु करावे अशी बाजू मांडत खुद्द नगर पंचायत उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर व माजी सरपंच शिरीष भांगे यांनी या कारवाईला विरोध केला होता. बंद दरम्यान ही त्यांनी व्यावसायिकांची बाजू मांडली. दरम्यान, स्वच्छ, सुंदर व विकसित कारंजा शहर करण्याच्या उद्देशाने आम्ही केवळ जागा मोकळी करणार होतो, असे मत मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी मांडले. आणि तोडलेले ओटे शुक्रवार(ता.११) पर्यंत सुस्थितीत करुन देण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले. त्यानंतर व्यावसायिकांनी नमते घेत दुकाने लावली.