शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय, राष्ट्रवादी चे पार्थ पवार पराभूत.

उरण जि.रायगड :- शिवसेनेचे खासदार, संसदरत्न श्रीरंग बारणे यांचा मावळ मतदार संघातून पुन्हा एकदा दणदणीत विजय झाला आहे.
राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांना दोन लाखाहून अधिक मताधिक्याने पराभवाची धूळ चारत श्रीरंग बारणे यांनी विजयश्री
संपादन केली आहे. कार्य सम्राट श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड, मावळ, उरण आणि पनवेल परिसरात केलेल्या
कामांची पावती म्हणून ते विजयी होतील याच्यात तिळमात्र शंका नव्हती, परंतु केवळ औपचारिकता म्हणून निकालाची
वाट बघणे अपरिहार्य होते. आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला दिले आहे. पनवेल चे
माजी खासदार श्री.रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार श्री.प्रशांतदादा ठाकूर, उरणचे आमदार श्री.मनोहरशेठ भोईर, उरण
तालुका प्रमुख श्री.संतोष ठाकूर तसेच रायगड जिल्हा भा.ज.पा. सरचिटणीस श्री. महेश बालदी यांचा आणि यांच्या
तमाम कार्यकर्त्यांचा या विजयामागे मोठा सहभाग आहे. उरण तालुका प्रमुख श्री. संतोष ठाकूर यांनी श्री.बारणे हे
कमीतकमी दीड लाख मतांनी निवडून येतीलच असा अंदाज वर्तवला होता आणि जनतेच्या आशीर्वादाने श्री. बारणेही त्या
अंदाजाला खरे उतरले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी राज साहेबांनी घेतलेल्या सभा हव्या तेवढ्या प्रभावी
ठरल्या नाहीत. राज साहेबांच्या सभेसाठी होणारी गर्दी आणि त्याचा निवडणूक निकालावर होणारा परिणाम यांच्यात
तफावत आढळून आली. जनता आता सुजाण, सक्षम झाली आहे त्यामुळे प्रत्येक नेत्याने आपले आत्मपरीक्षण करणे गरजेचं
आहे. केवळ भाषणांच्या जोरावर या काळात तरी कोणताच नेता निवडून येऊ शकत नाही. काही नेते मंडळी प्रचार
करताना समोरचा काय चुकला हे लोकांना सांगण्यात वेळ वाया घालवतात. मला वाटतं त्याच्यापेक्षा, ‘मी आत्तापर्यंत
काय केलं आणि यापुढे मी काय करणार आहे’, हे जनतेला पटवून द्यायला हवं. पण यांनी जनतेसाठी काय केलंच नाही तर
सांगतील काय? आणि त्यामुळे ‘मी पुढे हे करणार आहे’ ही लोकांना थाप वाटते. समोरच्याला शिव्या घालून जनता
कधीच आपली होत नाही. निवडून यायचं असेल तर आपलं कार्य सिद्ध करायला हवं. आणि म्हणूनच आपण केलेल्या
कार्याच्या जोरावर श्रीरंग बारणे हे पुन्हा निवडून आले. खरं तर श्रीरंग बारणें सारख्या बलाढ्य नेत्याच्या विरोधात पार्थ
पवारांनी उभे राहण्याच्या धाडसालाही दाद द्यायला हवी. आणि लोकशाहीने आपल्याला जे अधिकार दिलेत कुणाच्याही
विरोधात, कोणीही कुठेही उभा राहू शकतो त्यानुसार पार्थ पवारही काही चुकले नाहीत. असो. जनतेच्या आशीर्वादाने
पुन्हा एकदा एक हसतमुख व्यक्तिमत्व, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, मा.पंतप्रधान मोदींच्या देश विकासाच्या कार्यात
सहभागी होण्यास संसदेत चालले आहेत. मागील पाच वर्षात ते ज्या प्रमाणे संसदेत सक्रीय होते त्याही पेक्षा जोमाने ते
पुढील पाच वर्षात सक्रीय राहोत अश्या जनतेकडून त्यांना शुभेच्छा.

बाळकडू पत्रकार : श्री मनोहर फुंडेकर

उरण जि.रायगड