राजू शेट्टींना नडली साखरसम्राटांची संगत ! शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी. स्व. नेते बाळासाहेब माने यांची तिसरी पिढी संसदेच्या राजकारणात

बाळकडू वृत्तसेवा-कोल्हापुर जिल्हा
शिरोळ दि.२५\०५\२०१९
राज्यभरातील साखरसम्राटांशी उभा दावा मांडून राजू शेट्टी यांनी दोनवेळा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली होती; पण या लोकसभा निवडणुकीत मात्र राजू शेट्टी हे साखरसम्राटांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. त्यामुळे शेट्टींचे हे ‘नवीन राजकीय वाण’ रुजणार की कुजणार, अशी फार मोठी कुजबुज राज्यभर सुरू होती; पण प्रामुख्याने या भागातील बळीराजाने राजू शेट्टींचे हे नवीन वाण आपल्या राजकीय शिवारात रुजविण्याऐवजी कुजविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेचे विजयी उमेदवार धैर्यशील माने यांच्या रूपाने स्व. नेते बाळासाहेब माने यांची तिसरी पिढी संसदेच्या राजकारणात सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. या विजयामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. ‘शिवार ते संसद’ असा राजू शेट्टींचा गेल्या जवळपास वीस वर्षांतील प्रवास प्रामुख्याने ऊस आणि दूध दराच्या मुद्द्यावरूनच झालेला आहे. साधारणत:, 2000 साली राजू शेट्टी यांनी पहिल्यांदा उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक जिंकून राजकीय आखाड्यात उडी घेतली.
त्यानंतर 2004 साली कोल्हापूर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी त्यांना थेट विधानसभेचे दरवाजे खुले करून दिले. ‘आपला  आवाज’ संसदेत घुमला पाहिजे, शेतकर्‍यांचे प्रश्‍न दिल्ली दरबारी मांडले गेले पाहिजेत, या भूमिकेतून 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत साखर पट्ट्यातील शेतकर्‍यांनी राजू शेट्टी यांना संसदेत धाडले. त्यानंतर 2014 च्या लोकसभेतही शेतकर्‍यांनी दुसर्‍या वेळेसही त्यांच्या पारड्यात पहिल्यापेक्षा भरभरून दान टाकले. यावेळची परिस्थिती मात्र एकदम वेगळी होती. आजपर्यंत ज्या साखर सम्राटांविरुद्ध शेट्टी यांची ‘जंग’ होती, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीतील साखर सम्राटांशी शेट्टींनी ‘संग’ जमविला होता.
त्यामुळे अर्थातच ऊस उत्पादकांसह सर्वसामान्य मतदारांच्याही भुवया उंचावल्या होत्या. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असल्याने आपण काँग्रेसराष्ट ्रवादीशी आघाडी केल्याचा त्यांचा दावा केला होता, मात्र त्यांचा हा दावा प्रामुख्याने ऊस आणि दूध उत्पादकांच्या पचनी पडला नसल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.
आजपर्यंत ज्यांच्याशी उभा दावा मांडला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचा शेट्टींचा निर्णय या भागातील अनेकांना रुचला नसल्याचे निकालावरून स्पष्टपणे जाणवते. राजू शेट्टी यांनी या निवडणुकीत केवळ साखर सम्राटांशी हातमिळवणीच केली नाही तर त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीतील उमेदवार विशाल पाटील हे स्वत:च एक साखर कारखानदार होते. त्यामुळे अनेक प्रश्‍न मतदारांच्या मनात निर्माण झाले होते. एकतर विशाल पाटील यांच्या कारखान्याकडे शेतकर्‍यांची कित्येक कोटी रूपयांची ऊस बिलाची थकबाकी आहे. त्यामुळे उद्या जर सांगली कारखाना विरुद्ध ऊस उत्पादक शेतकरी असा संघर्ष सुरू झाला तर राजू शेट्टी हे शेतकर्‍यांच्या बाजूने उभा राहतील की नाही, याबद्दल शेतकर्‍यांच्याच मनात आशंका निर्माण झाली होती. निवडणुकीच्या आधी काही दिवस विशाल पाटील यांनी ‘मोदींच्या मांडीला मांडी लावून बसणारे शेट्टी शेतकर्‍यांना काय न्याय मिळवून देणार’, असा सवाल केला होता. त्याच विशाल पाटलांच्या मांडीला मांडी लावून शेट्टी हे बसल्याचे ऊस पट्ट्यातील शेतकर्‍यांना अजिबात रुचले नव्हते.
त्यामुळे शेतकर्‍यांनी आपली नाराजी मतपेटीतून व्यक्‍त करून शेट्टींच्या नव्या राजकीय साट्यालोट्यात आपणाला रस नसल्याचे दाखवून दिले आहे. 2014 साली राजू शेट्टी हे भाजपसेना युतीसोबत असल्याने शेतकरी संघटनेसह या दोन पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या पाठीशी होती. त्यामुळे ते पावणेदोन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले होते. मात्र, ही राजकीय गोळाबेरीज यावेळी बदललेली होती. या मतदारसंघात सत्यजित पाटील (शिवसेना, शाहूवाडी), उल्हास पाटील (शिवसेना, शिरोळ), सुजित मिणचेकर (शिवसेना, हातकणंगले), सुरेश हाळवणकर (भाजप, इचलकरंजी) आणि शिवाजीराव नाईक (भाजप, शिराळा) असे युतीचे पाचही आमदार युतीधर्म म्हणून धैर्यशील माने यांच्या पाठीशी राहिलेले दिसतात, तर केवळ जयंत पाटील (राष्ट्रवादी, वाळवा) हे एकमेव आमदार शेट्टी यांच्यासोबत होते.
या मतदारसंघात भाजपचे दोन आणि शिवसेनेचे तीन आमदार आहेत, म्हणजे कागदावरील गणित तरी माने यांच्या बाजूने झुकत असल्याचे पहिल्यापासून स्पष्टपणे दिसत होते, पण कागदावरचे गणित आणि प्रत्यक्षातील राजकीय वाटचाल यांचा ताळमेळ जमतो की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र, युतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युतीधर्माचे प्रामाणिकपणे पालन केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
 या मतदारसंघातील युतीच्या पाचही उमेदवारांनी आपली ताकद निर्णायकपणे आणि निर्विवादपणे धैर्यशील माने यांच्या पाठीशी उभा केल्याने त्यांना ‘जायंट किलर’ होण्याची संधी मिळाली, हे नाकारून चालणार नाही. युतीच्या या पाच आमदारांपैकी काहीजण आपणाला छुपी मदत करतील अशी शेट्टी यांना आशा होती, पण जिथे हक्‍काच्या ऊस उत्पादकांनी शेट्टींची साथ सोडली होती, तिथे त्यांना युतीच्या आमदारांकडून छुपी मदत मिळणे शक्यच नव्हते आणि झालेही तसेच. शिवाय कधी नव्हे ते या ठिकाणी ‘जात फॅक्टर’ प्रचलीत होऊन त्याचा शेट्टींना दणका बसल्याचेही दिसते.
पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यातील शेतकर्‍यांनी आजपर्यंत शेट्टी यांना चढत्या क्रमाने जिल्हा परिषद, विधानसभा आणि संसदेचे दरवाजे उघडून दिले होते, ते केवळ आणि केवळ ऊस आणि दूध दराच्या मुद्द्यावर. राजू शेट्टींची राजकीय भूमिका काय, याला त्या त्या वेळेस फारसे महत्त्व दिले नव्हते. त्यामुळे शेट्टी यांनी भागातील शेतकर्‍यांना आपण घेईल त्या भूमिकेशी सहमत असे गृहीतच धरले होते.
मात्र शेट्टींनी थेट ऊस उत्पादकांचे परंपरागत हाडवैरी समजण्यात येणार्‍या साखर सम्राटांच्या गळ्यात गळे घातल्या नंतर मात्र याच शेतकर्‍यांनी शेट्टींचे लोढणे आपल्या गळ्यातून सोडून टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किमान भविष्यात तरी शेट्टी यांना आपली संघटनात्मक आणि राजकीय वाटचाल अतिशय सावधपणे करावी लागणार आहे.
शिष्याकडून गुरूला धोबीपछाड!
राजू शेट्टी यांच्या गेल्या जवळपास वीस वर्षांच्या राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीत त्यांना सदाभाऊ खोत यांची सावलीसारखी साथ मिळत होती, पण खोत हे मंत्री झाल्यापासून शेट्टी आणि खोतांची मैत्री राजकीय हाडवैर्‍यात परावर्तीत झाली होती. त्यामुळे शेट्टी यांच्या पराभवासाठी खोत यांनी जवळपास दोन वर्षांपासून या ठिकाणी फिल्डिंग लावली होती. ऐन निवडणुकीत तर सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्या पाडावासाठी पायाला भिंगरी लावून प्रचार केला.
शेट्टी यांचे कच्चे दुवे सदाभाऊंना चांगलेच परिपाठ होते. नेमके हे कच्चे दुवे हेरून सदाभाऊंनी त्यावर आघात करून अखेर शेट्टी यांना घायाळ करून टाकले. शेट्टी यांच्या पराभवात आणि धैर्यशील माने यांच्या विजयात सदाभाऊ खोत यांचा वाटा सर्वाधिक आणि सर्वात महत्त्वपूर्ण मानावा लागेल.
बाळकडू पत्रकार-विनायक कदम
शिरोळ तालुका प्रतिनिधी जि.कोल्हापुर
मोबा.९७६२३१५४९१