हवेली तालुक्यातील सखा सह्याद्री या गिर्यारोहक परिवाराने अत्यंत कठीण श्रेणीतील मानला जाणारा ४३० फूटांचा उंच लिंगाणा सुळका सर करत फडकविला ३० फूटी भगवा ध्वज

हवेली तालुक्यातील सखा सह्याद्री या गिर्यारोहक परिवाराने अत्यंत कठीण श्रेणीतील मानला जाणारा ४३० फूटांचा उंच लिंगाणा सुळका सर करत फडकविला ३० फूटी भगवा ध्वज

बाळकडू : श्रीनिवास पाटील
मोबा.९७३०६९२९१९
हवेली (पुणे) :- चढाईसाठी अत्यंत अवघड मानला जाणाऱ्या ४३० फुट उंच कठीण श्रेणीतील लिंगाणा सुळक्यावर तब्बल ३० फूटी भगवा ध्वज फडकवण्याची कामगिरी हवेली तालुक्यातील सखा सह्याद्री परिवाराने शिवजयंतीच्या दिवशी पार पाडली. पुणे जिल्हातील वेल्हे तालुका आणि रायगड जिल्हा यांच्या सीमेवर असलेला लिंगाणा सुळका सर करणे हे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असते. या सुळक्यावर जाण्यासाठी अत्यंत खडतर प्रवास करून जावे लागते. अश्या अत्यंत दुर्गम ठिकाणी ३० फूटी ध्वज उभा करण्याचे स्वप्न पाहिले ‘सखा सह्याद्री परिवारा’चे संचालक सतीश हरगुडे यांनी आणि सुरू झाला एक चित्तथरारक प्रवास.
ध्वज मोहीमेत सहभागी होण्यासाठी अनुभवी ट्रेकर्सना निवडले गेले. पहिला अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे लिंगाणा सुळक्याच्या वरच्या टोकावर ध्वज लावण्यासाठी खड्डा खोदणे. २६ जाने  मोहिमेच्या या पहिल्या टप्प्यासाठी सतीश हरगुडे, अक्षय वाघमारे, गौरव  इ. असे सहा जण स्वतः सोबत पहार, फावडे असे साहित्य घेऊन गेले होते. सहा मावळ्यांनी खड्डा खोदण्याचे काम केले. 
त्यानंतर दुसरा  टप्पा ७ फेब्रुवारीला सुरु झाला. पुन्हा एकदा जाऊन खड्डा खोदलेल्या ठिकाणी बोल्ट फिक्स करणे आणि सिमेंट काँक्रीट टाकून ते पक्के करणे, असे या दुसऱ्या टप्प्याचे उद्दिष्ट होते. सतीश हरगुडे, नवनाथ (अप्पा) सातव,अक्षय वाघमारे, गौरव आणि प्रतीक असे पाच जण पहाटे ३ वाजता मोहरी गावात पोहोचले. जिथं मोकळं जाणं कठीण तिथं हे अवजड साहित्य घेऊन जायच होत,पण कोणीही कसलीही हरकत न घेता सगळं सामान गाडीतून काढून खांद्यावर घेऊन रात्रीचा अंधार चिरत पाचजण नाळेच्या दिशेने निघाले. प्रत्येकाजवळ किमान ५० किलो वजन अंगावर असेल.
सर्व सामानासाहित सर्व जण सायंकाळ होण्याच्या सुमारास लिंगण्यावर पोहचलो ४ फूट खड्डा खोदला होता,तो आणखी ४ फूट खोदायचा होता. खोदण्यास सुरवात केली.अक्षय आणि गौरव परत सिमेंट माल कालविण्यासाठी पाणी आणायला खाली गुहेपर्यंत गेले.तोपर्यंत आप्पा,सतीश आणि प्रतीक यांनी खड्डा खोदला. खड्डा इतका खोल गेला की प्रतीक खड्डयात उभा राहिला तर वर दिसेनाही आणि वर येतही येईना.७.५ फुटाच्या खड्डयात सिमेंट,वाळू  आणि खडी यांचे मिश्रण ओतून बोल्ट उभे केले गेले. सूर्य मावळत होता.अंधार पडत होता. अखेरीस हे काम पूर्ण करून सर्वजण निघाले. प्रचंड भूक लागली होती.जवळ खाण्यासाठी काहीच शिल्लक नव्हते. सगळे खाली उतरवेपर्यंत पहाटेचे ४ वाजले होते,
या मोहिमेत हे सर्वजण चक्क २ दिवस आणि २ रात्री जागे होते 
क्षणाचा विसावा नव्हता.अंगाचा पार भुगा आणि पोटात भुखेने आग पेटली होती. पण पर्याय नव्हता.पुढे नाळ चढून सरपंचाच्या घरी जाऊन सर्वांनी जेवण केल आणि परतीच्या प्रवासाला निघाले.
अंतिम टप्पा होता तीस फूटी खांब रायलिंग पठारावरून लिंगाणा सुळक्यावर पोहोचवणे आणि उभा करणे.  हे सर्वात कठीण काम होते. या टप्प्यासाठी दोन टीम केल्या गेल्या. एका टीमने १५ फेब्रुवारीला जाऊन रायलिंग पठार ते लिंगाणा सुळका असा सुमारे ५०० मीटर दोर बांधला. या टिम मध्ये सतीश हरगुडे, नवनाथ सातव, रोहन पवार, अक्षय वाघमारे,गौरव भोकरे, उमेश बोरखडे, सोहेल शेख, विलास कुमकले आणि अनिकेत भोसले इ. जण होते.
 दुसरी टीम रायलिंग पठारावर थांबली. या टीममध्ये सर्वांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी ६३ वर्षाचे जेष्ठ गिर्यारोहक दिलीप तात्या उंदरे हे आवर्जून उपस्थित होते. सोबतच स्वप्नील उंदरे, सतीश सावंत, अभिजित उंदरे, प्रवीण उंद्रे, अमोल नेवाळे, विवेक पवळे, सनी परदेशी हे अनुभवी ट्रेकर होते. मोहीम ३ ते ४ दिवस चालणार असल्यामुळे सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रियंका हरगुडे,अश्विनी काळभोर आणि योगिता नेवाळे यांनी जबाबदारी घेतली होती. या सर्वांच्या सहाय्यासाठी ओम भोसले, किरण शेलार, करण शेलार, विवेक जगताप, शहाजी जाधव, यश भोसले, मयूर कडू आणि ऋषिकेश बोरकर हे युवा ट्रेकर सज्ज झाले. 
रायलिंग ते लिंगाणा अश्या बांधलेल्या दोराला कप्पीच्या मदतीने खांब बांधून तो लिंगण्यावर असलेल्या टीमने ओढून घेतला. लिंगाण्यावर असलेल्या गुहेच्या वरच्या टप्प्यावर पोहोचवला. यानंतर पुन्हा दोन्ही टीमने मिळून तो समीटला (सर्वात वरचे टोक) पोहोचवला. ध्वजस्तंभ उभा करून त्यावर भगवा ध्वज फडकवला गेला. शिवजयंतीच्या दिवशी हे कार्य पार पाडून सखा सह्याद्री टीमने अनोख्या पध्दतीने शिवाजी महाराजांना अभिवादन केले. 
वानरलिंगी सुळका,कोकणकडा १८०० फूट रॅप्पेलिंग
लिंगाणा २५ वेळा सर केला आहे,
सांधण व्हॅली,ढाक,बहिरी,वासोटा,रतनगड
,हरिहर,राजगड,श्रीमान रायगडसह सह्याद्रीच्या शंभरहून जास्त मोहीम सखा सह्याद्री या गिर्यारोक टिमने केल्या आहेत.
रायलिंग पठार व लिंगाणा भागात वृक्षारोपण करण्याचा सखा सह्याद्री टिमचे प्रमुख श्री सतिश हरगुडे व सखा सह्याद्री टिम यांचा संकल्प आहे.
या ध्वजमोहिमेचे नेतृत्व ‘सखा सह्याद्री’ टिम चे प्रमुख सतीश हरगुडे यांनी केले. त्याचबरोबर सुमारे २५ जणांनी या मोहिमेत सहभाग घेतला. मोहरी गावचे सरपंच श्री. पोटे यांनी मोलाचे सहकार्य केले.ज्या ठिकाणी एकट्याने जाणे देखील आव्हानात्मक आहे, अशा ठिकाणी १५० किलो वजनाचा ३० फूटी ध्वज उभा करणे हे खरंच असामान्य काम आहे. वेगाने वाहणारे वारे, पाऊस यांची तमा न बाळगता विपरीत परिस्थितीत असामान्य धाडस आणि संयम दाखवून ही ध्वज मोहीम यशस्वी होण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व गिर्यारोहकांचे सर्व स्तरातुन मोठे  कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लिंगाणा ध्वज मोहिमेमध्ये सहभागी असलेले धाडसी गिर्यारोहक 
सतीश हरगुडे (leader), नवनाथ सातव, दिलीप उंद्रे,
सतीश सावंत, स्वप्निल उंद्रे, अभिजित उंद्रे, प्रवीण उंद्रे,
 विवेक पवळे, अमोल नेवाळे, योगिता नेवाळे, प्रियांका हरगुडे, 
रोहन पवार, अश्विनी काळभोर, विलास कुमकले, अक्षय वाघमारे,
ओम भोसले, गौरव भोकरे, सनी परदेशी,किरण शेलार, 
करण शेलार,सोहेल शेख,विवेक जगताप,शहाजी जाधव,
अनिकेत भोसले, उमेश बोरखाडे, यश भोसले, मयूर कडू, ऋषिकेश बोरकर.