ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची सफाई जोरात सुरू. ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश

बाळकडू वृत्तसेवा
ठाणे शहर :-२१/०५/२०१९
ठाणे : पावसाळा तोंडावर आला असताना ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची सफाई जोरात सुरू आहे. आतापर्यंत ४५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने ३१ मेची मुदत ठेकेदारांना दिली आहे. त्यामुळे अवघ्या १२ दिवसांत उर्वरित ५५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ३२५ नाले आहेत. त्यामध्ये १३ मोठे नाले असून त्यांना शहरातील छोटे नाले जोडण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामांमध्ये नालेसफाईची कामे करण्यात येतात. एप्रिल महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया उरकून मे महिन्यात नालेसफाईची कामे सुरू केली जातात. जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ापर्यंत ही कामे सुरूच असतात. यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नालेसफाईच्या कामांना विलंब होण्याची शक्यता होती. मात्र, पालिकेने या कामांचे नियोजन करून दरवर्षीप्रमाणे यंदा ७ मे पासून नालेसफाईची कामे सुरू केली आहेत.
ठाणे शहर, वागळे इस्टेट, घोडबंदर, कळवा आणि मुंब्रा या भागात नालेसफाईची कामे सुरू आहेत. या कामांसाठी ६० निविदा काढून ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत ठेकेदारांना दिली असून आतापर्यंत ४५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे योग्यप्रकारे सुरू आहेत की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नालेसफाईच्या कामांसाठी गेल्यावर्षी १० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, यंदा या कामांमध्ये दोन कोटी रुपयांची कपात झाली आहे.
संदिप देवकांबळे बाळकडू पत्रकार
ठाणे शहर प्रतिनिधी
मोबाईल नंबर ७७१८०२६२४८
ईमेल आयडी sandeepyipl@gmail.com