उत्तर महाराष्ट्रातील सहाही जागेवर महायुतीचा विजय

बाळकडू वृत्तसेवा ,
दिनेश शिंदे , उत्तर महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी
         देशभरात पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकांत जनतेने पुन्हा एका नरेंद्र मोदी यांना साथ देत महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिले आहे . महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ जागा महायुतीने आपल्या नावे केल्या तर कॉग्रेसला १ , राष्ट्रवादीला ५ , वंबआ ला १ व अपक्ष १ जागा मिळाली .
          उत्तर महाराष्ट्रात युतीने सर्वच्या सर्व जागा मिळवून आघाडीचा धुव्वा उडवला आहे . यात भाजपाने पाच तर सेनेने एक जागा राखण्यात यश मिळवले आहे .
          धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार व संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी ६१३५५३ मते घेऊन विजय मिळवला . नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. हीना गावित यांनी ६३९१३६ मते मिळवत विजय संपादन केला . जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उन्मेश पाटील यांनी ७१३८७४ मते मिळवत विजय साकारला . तर रावेर मधुन भाजपाच्या रक्षा खडसे यांनी ६५५३८६ एवढी मते मिळवुन विजय संपादन केला . दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी ५६५२०१ व नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी ५६०२२९ इतके मते मिळवुन विजय संपादन केला .
       विरोधकांच्या कुठल्याही प्रकारच्या प्रचाराला जनतेने नाकारत नरेंद्र मोदींवर व महायुतीवर पुन्हा विश्वास दाखवला आहे .
        २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३५० जागा मिळवुन पुन्हा सत्तेत आपले प्रबळ स्थान मिळवले आहे . कॉग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला नरेंद्र मोदींच्या त्सुनामीने ८६ जागांवर रोखले तर इतरांना १०६ जागांवर यश मिळवता आले आहे . आजवर कुठल्याही पक्षाला असा नेत्रदिपक व दैदिप्यमान यश मिळवता आले नव्हते . देशातल्या नवमतदारांनीही पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे .