कल्याण लोकसभेची सुभेदारी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडेच तर भिवंडी लोकसभेत कपिल पाटील यांची सरशी

बाळकडू वृत्तसेवा | ठाणे जिल्हा
कल्याण / भिवंडी  दि.२३/०५/२०१९
कल्याण लोकसभेची सुभेदारी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडेच तर भिवंडी लोकसभेत कपिल पाटील यांची सरशी
कल्याण लोकसभा मतदारसंघाची सुभेदारी पुन्हा एकदा आपल्याकडे राखण्यात महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना तर भिवंडी लोकसभेचा गड आपल्याकडेच राखण्यात कपिल पाटील यांना यश आले आहे. श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांनी केवळ आपली सुभेदारीच कायम राखली नाही तर गेल्या निवडणुकीपेक्षा विक्रमी मताधिक्य मिळवल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार डॉ. शिंदे यांच्यासाठी ही लढत काहीशी सोपी असली तरी त्यांनी मात्र सुरुवातीपासूनच ती अत्यंत गांभिर्याने घेतलेली पाहायला मिळाले. तर शिंदे यांच्या प्रत्येक सभा, प्रचार रॅलीला मिळालेल्या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरूनच या विक्रमी मताधिक्याची चुणूक दिसून आली होती. तर गेल्या वेळेपेक्षा काही टक्क्यांनी वाढलेले मतदान, प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एका ठराविक समाजाबाबत झालेला प्रचार आणि डोंबिवलीसारख्या बालेकिल्ल्यात मतदारांमधील अनुत्साह यामुळे महायुतीची धाकधूक काहीशी वाढली होती. मात्र मतदार राजाने या सर्व किंतु-परंतुंवर मात करीत डॉ. शिंदे यांच्याच पारड्यात भरभरून आपले दान टाकले.

तर या भरघोस यशाचे श्रेय हे श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 5 वर्षांत केलेल्या विकासकामांना, महायुतीच्या कार्यकर्त्यांना असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. श्रीकांत शिंदे यांना गेल्या वेळेपेक्षा जास्त मतदान आणि मताधिक्य मिळाल्याचे पाहायला दिसत आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात केवळ ४५.८९ टक्के मतदान झाले होते. ८ लाख ८९ हजार मतांपैकी तब्बल ६३ टक्के म्हणजेच ५ लाख ५४ हजार मते डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाबाजी पाटील यांना २ लाख ७ हजार मतांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीपेक्षा श्रीकांत शिंदे यांना यंदा एक लाख जास्त मते मिळाली आहेत. कळवा-मुंब्रा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातूनही शिंदे यांनी मुसंडी मारली आहे.

भाजपच्या कपिल पाटील यांनी १ लाख ५६ हजारांच्या मताधिक्याने विजय नोंदविला आहे. पाटील यांना ५ लाख २३ हजार तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना ३ लाख ६७ हजार मते मिळाली. गेल्या निवडणुकीपेक्षा पाटील यांचे मताधिक्य ४६ हजारांनी वाढले आहे. कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, मुरबाड आणि शहापूर या विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे.

बाळकडू प्रतिनिधी – शहाजी घाग
कल्याण तालुका प्रतिनिधी