कोल्हापूर व हातकणगले : दोन्ही मतदारसंघांवर पहिल्यांदाच शिवसेनेचा कब्जा

बाळकडू वृत्तसेवा-कोल्हापुर जिल्हा
शिरोळ दि.२५\०५\२०१९
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच कोल्हापुरात शिवसेनेची शाखा स्थापन झाली. कालांतराने जिल्हाभर शिवसेना पसरली. मग हळूहळू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याइतपत शिवसेना मोठी झाली.
1991 ला शिवसेनेने लोकसभेला उमेदवार उभा केला. त्यानंतर आजतागायत प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असतो. परंतु, त्यांची पराजयाची मालिका सुरूच होती. अखेर28 वर्षांनंतर शिवसेनेला प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या रूपाने यश मिळाले आणिपराजयाची मालिका खंडित झाली. अखेर कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यावर भगवा फडकला.
अशाप्रकारे शिवसेनेने दोन्ही मतदारसंघांवर पहिल्यांदाच कब्जा मिळवला. कोल्हापुरात 16 मे 1986 ला शिवसेनेची शाखा स्थापन झाली. त्याच दिवशी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिली सभा बिंदू चौकात घेतली होती.
15 वर्षांनी असाही योगागोग…
2004 मध्ये झालेली लोकसभा निवडणूक श्रीमती निवेदिता माने व सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादीकडून लढविली होती. माने यांनी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून, तर मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला होता.
त्यानंतर राजकीय समीकरणे बदलत गेली. माने यांचा मुलगा धैर्यशील माने व मंडलिक यांचा मुलगा प्रा. संजय मंडलिक यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. विशेष म्हणजे, 2019 च्या निवडणुकीत दोघेही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले. 2004 मधील माने व मंडलिक यांच्या विजयाची पुनरावृत्ती 2019 मध्ये त्यांच्या मुलांनी केली.
1990 मध्ये कोल्हापूर शहर मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला. त्यानंतर हळूहळू शिवसेना जिल्हाभर पसरली. अपवाद वगळता 1990 पासून आजअखेर शिवसेनेचेच कोल्हापूर शहरावर वर्चस्व राहिले.
प्रत्येकवेळी शिवसेनेकडून नवा उमेदवार
कोल्हापूरच्या राजकारणात 1991 पासून शिवसेनेने शिरकाव केला. 1991 पासून लोकसभेची जागा शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर लढवायला सुरुवात केली. आतापर्यंतच्या नऊही वेळा शिवसेनेने ही जागा धनुष्यबाण चिन्हावरच लढविली; परंतु एकदाही शिवसेनेला विजयाला गवसणी घालता आली नाही. कारण प्रत्येकवेळी शिवसेनेने या मतदारसंघात नवाच उमेदवार दिला.
निवडणूक लढल्यानंतर ते शिवसेनेपासून बाजूला गेले. यंदा पहिल्यांदाच प्रा. संजय मंडलिक यांना दुसर्‍यांदा (2014 नंतर पुन्हा 2019) उमेदवारी दिली. त्याचा मोठा फायदा शिवसेनेला झाल्याचे दिसून येते.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत तर दहापैकी सहा विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकला. आता जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकून शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यावर भगवे वादळ निर्माण केले. कोल्हापूर हा सुरुवातीपासूनच काँग्रेस व डाव्या पक्षांचा बालेकिल्ला होता; परंतु नंतर या दोन्हींतील राजकीय चढाईतून शिवसेनेला संधी मिळत गेली.
1991 ला शिवसेनेनेपहिल्यांदा कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढविली. कोल्हापूरचेमाजी महापौर रामभाऊ फाळके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. फाळके यांना त्यावेळी 75,177 मते मिळाली. काँग्रेसच्या उदयसिंगराव गायकवाड यांनी 2,69,508 मते मिळवून फाळके यांचा 1,94,331 मतांनी पराभव केला. 1996 मध्ये शिवसेनेने सिने अभिनेते रमेश देव यांना रिंगणात उतरवले; परंतु त्यांचाही उदयसिंगराव गायकवाड यांनी 68,325 मतांनी पराभव केला. गायकवाड यांना 2,36,739 तर देव यांना 168,414 मते मिळाली. 1998 मध्ये शिवसेनेने विक्रमसिंह घाटगे यांना उमेदवारी दिली.
त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून सदाशिवराव मंडलिक यांनी निवडणूक लढविली. मंडलिक यांनी घाटगे यांचा 61 हजार 598 मतांनी पराभव केला. मंडलिक यांना 3,67,951 तर घाटगे यांना 3,06,353 मते मिळाली. अवघ्या वर्षभरात 1999 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. यावेळी मेजर जनरल शिवाजीराव पाटील यांना शिवसेनेने मैदानात उतरवले.  काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी तिरंगी लढत झाली. काँग्रेसच्या उदयसिंगराव गायकवाड यांना 2,37,549 व पाटील यांना 1,63,866 तर मंडलिक यांना 3,46,459 मते मिळाली. मंडलिक यांनी 1,08,910 मताधिक्याने विजय मिळविला.
2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून धनंजय महाडिक यांनी निवडणूक लढविली. अत्यंत चुरशीने निवडणूक झाली. राष्ट्रवादीच्या मंडलिक यांना 4,01,922तर महाडिक यांना 3,87,169 मते मिळाली. मंडलिकांनी अटीतटीच्या लढतीत महाडिक यांचा अवघ्या 14 हजार 753 मतांनी पराभव केला.  2009 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून विजय देवणे यांनी निवडणूक लढविली.
ही निवडणूक तिरंगी झाली. देवणे यांना 1,72,822 मते मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजीराजे छत्रपती यांना 3,83,282 तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या मंडलिक यांना 4,28,082 मते मिळाली. अपक्ष लढूनही मंडलिक यांनी विजय मिळविला. 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या मंडलिक यांच्या मुलाला म्हणजेच प्रा. संजय यांना 2014 मध्ये शिवसेनेने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्याशी त्यांचा सामना झाला. या निवडणुकीत महाडिक यांना 6,07,665 तर मंडलिक यांना 5,74,406 मते मिळाली. महाडिक यांनी मंडलिकांचा 33,259 मतांनी पराभव केला.
इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ 1991 ला भाजपकडे होता. या पक्षातून सुभाष वोरा यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब माने (धैर्यशील माने यांचे आजोबा) यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. वोरा यांना अवघी 40,007 मते तर माने यांना 3,60,679 मते मिळाली होती. माने यांनी तब्बल 2,57,059 मताधिक्याने वोरा यांचा पराभव केला.
1996 च्या निवडणुकीत भाजपने गणपतराव सरनोबत (सरकार) यांना उमेदवारी दिली. त्यावेळी काँग्रेसकडून कल्लाप्पा आवाडे रिंगणात उतरले होते. सरनोबत यांना 1,25,667 तर आवाडे यांना 2,37,510 मते मिळाली. निवेदिता माने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून 2,09,000 मते घेतली. त्यामुळे आवाडे यांनी अवघ्या 28,510 मतांनी विजय मिळविला. 1996 ला अपक्ष लढवून चांगली मते घेतलेल्या निवेदिता माने यांना 1998 ला शिवसेनेने उमेदवारी दिली. आवाडे व माने यांच्यात लढत झाली. आवाडे यांना 3,44,817 तर माने यांना 3,32,623 मते मिळाली. आवाडे यांनी केवळ 12,194 मतांनी विजय मिळविला.
1999 मध्ये निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्याने शिवसेनेने पुंडलिक जाधव यांना रिंगणात उतरवले. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी तिरंगी लढत झाली. या लढतीत माने यांना 3,37,657, काँग्रेसच्या कल्लाप्पा आवाडे यांना 3,24,845 तर जाधव यांना 1,00,697 मते मिळाली. माने यांना अवघ्या 12,812 मतांनी विजय मिळाला. 2004मधील निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा उमेदवारी बदलून डॉ. संजय पाटील यांना रिंगणात उतरवले. राष्ट्रवादीच्या माने यांच्याबरोबर त्यांची लढत झाली.
माने यांना 4,22,272 तर पाटील यांना 3,21,223 मते मिळाली. माने यांनी पाटील यांचा तब्बल 1,01,049 मतांनी पराभव केला. 2009 मधील निवडणुकीत शिवसेनेने रघुनाथ पाटील यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीकडून माने यांच्याबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी रिंगणात होते. या निवडणुकीत शेट्टी यांनी माने यांचा पराभव केला. शेट्टी यांना 4,81,025, माने यांना 3,85,965 मते मिळाली. तर पाटील यांना अवघी 55,050 मतावर समाधान मानावे लागले. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला मातब्बर उमेदवारच मिळाला नव्हता. 2019 मध्ये धैर्यशील माने यांनी दहा वर्षांनंतर आईच्या पराभवाचा बदला शेट्टी यांना पराभूत करून घेतला.
कोल्हापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आजपर्यंतचे उमेदवार व कंसात मिळालेली मते…
1991 – रामभाऊ फाळके (75,177)
1996 – रमेश देव (1,68,414)
1998 – विक्रमसिंह घाटगे (3,06,353)
1999 – मेजर जनरल शिवाजीराव पाटील (1,63,866)
2004 – धनंजय महाडिक (3,87,169)
2009 – विजय देवणे (1,72,822)
2014 – प्रा. संजय मंडलिक (5,74,406)
2019 – प्रा. संजय मंडलिक (7,01,776) 17 व्या फेरी अखेर
हातकणंगले लोकसभा शिवसेनेचे आजपर्यंतचे उमेदवार व कंसात मिळालेली मते…
1998 – निवेदिता माने (3,32,623)
1999 – पुंडलिक जाधव (1,00,697) यावेळी निवेदिता माने राष्ट्रवादीकडून लढून विजयी झाल्या.
2004 – डॉ. संजय पाटील (3,21,223) निवेदिता माने सलग दुसर्‍यांदा विजयी
2009 – रघुनाथ पाटील (55,050) राजू शेट्टी विजयी
2014 – निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नाही
2019 – धैर्यशील माने (5,49,403) 15 व्या फेरीअखेर
बाळकडू पत्रकार-विनायक कदम
शिरोळ तालुका प्रतिनिधी जि.कोल्हापुर
मोबा.९७६२३१५४९१